⚡मालवण ता.१०-:
शिक्षण क्षेत्रातील अत्युच्च योगदानाबद्दल ‘शिक्षणमहर्षी’ ही उपाधी लाभलेले रामभाऊ परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परुळेकर यांच्या कार्याला उजाळा देत, त्यांच्या शैक्षणिक विचारांची प्रेरणा घेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते परुळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी परुळेकर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, दूरदृष्टी आणि समाजहिताचे कार्यावर प्रकाश टाकला. प्रा. मिलन सामंत यांनी परुळेकर यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा विस्तृत परिचय करून देत त्यांच्या विचारांची आजच्या काळातही आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. तसेच महाविद्यालयाला रामभाऊ परुळेकर यांचे नाव देण्यात आले यामागे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाचीच पावती आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
डॉ. उज्वला सामंत यांनी मालवण पंचक्रोशीतील शैक्षणिक चळवळीत परुळेकर यांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू स्पष्ट केले. प्रा. हसन खान यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या परुळेकरांनी स्थापन केलेल्या संशोधन संस्थेचा इतिहास आणि उद्देश याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अन्वेषा कदम यांनी केले. तर आभार प्रा. हसन खान यांनी मानले. कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, व मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.