डॉ. राहुल पंतवालावलकर:भंडारी हायस्कुलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी…
मालवण (प्रतिनिधी)
आपले शरीर हे पंचमहाभूतांप्रमाणे असून आपले शब्द, आपला स्पर्श, वागणे आणि आपला आहार हे आपले पहिले गुरु असून यांच्यामुळेच आपल्या शरीराचा आणि एकूण व्यक्तिमत्वाचा विकास होतो, आपले बोलणे चांगले हवे, आपले वागणे व हावभाव नीटनेटके हवे तसेच योग्य आहार हवा, तरच आपण आपली प्रगती साधू शकतो. आपण स्वतः किती व्यवस्थित आहोत सर्वात महत्वाचे आहे, असे प्रतिपादन आयुर्वेदिक डॉक्टर राहुल पंतवालावलकर यांनी भंडारी ए. सो. हायस्कुल मालवण येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालक यांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. तर शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रमुख पाहूणे व मार्गदर्शक डॉ. राहुल पंतवालावलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच व्यास मुनी व सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, मुख्याध्यापक हणमंत तिवले, शिक्षक आर. बी. देसाई उपस्थित होते. प्रास्ताविक आर. बी. देसाई यांनी केले.
यावेळी डॉ. राहुल पंतवालावलकर म्हणाले, गुरु, शिक्षक, पालक यांच्यापेक्षा आपल्यातील चुका आपल्यालाच समजल्या पाहिजेत. आई वडिलांना कधीही गृहीत धरू नका, आपल्या अभ्यासाचा आणि पालकांच्या अभ्यासाची कधीही तुलना करू नका, आपल्या जीवनात आपले वडील हेच खरे बॉयफ्रेंड आणि आई हीच खरी गर्लफ्रेंड असते, असेही डॉ. पंतवालावलकर म्हणाले.
यावेळी वामन खोत, आर. डी. बनसोडे यांनीही मार्गदर्शन केले. तर विद्यार्थ्यांनी गुरु, शिक्षक, आई वडील यांच्याप्रति आपल्या भावना मांडल्या. सूत्रसंचालन विद्यार्थिनी त्रिवेणी लुडबे हिने केले. आभार आर. बी. देसाई यांनी मानले. यावेळी प्रशालेतील शिक्षक तसेच पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.