स्थानिकांची सरपंचांकडे निवेदनद्वारे मागणी..
⚡बांदा ता.०९-: इन्सुली गावात परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. गावात त्यांची दहशत वाढली आहे. महिलांना अश्लील हावभाव करून दाखविले जातात. भविष्यातील धोका ओळखून फेरीवाल्यांना गावात फिरण्यास अटकाव करावा, अशी मागणी स्थानिकांनी माजी ग्रामपंचायत सदस्यां सौ तपस्वी मोरजकर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवारी सदरचे निवेदन ग्रामसेवक चव्हाण यांच्यकडे इन्सुली ग्रामस्थांनी दिले.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्या तपस्वी मोरजकर, माजी सरपंच पुजा पेडणेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गजेंद्र कोठावळे, माजी सरपंच सदा राणे, नाना पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मोरजकर, रामदास राणे, गुरु पाटील, प्रथमेश मोरजकर, उदय शेट्ये, गंगाराम पेडणेकर, प्रकाश शेटये, आनंद शेटये, गुरुनाथ शेटये, नारायण दळवी, अमित सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते
निवेदनात म्हटले आहे की, इन्सुली गावात दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकणारे फेरीवाले फिरत असतात. गावाचा विस्तार मोठा असल्याने कोण फेरीवाला कुठून येतो, कोठे जातो हे लक्षात येत नाही. गावातून दोन महामार्ग असल्याने या सर्वांची बिनभोबाटपणे गावात फिरती असते. त्यांच्यावर कोणाचाच वचक नसल्याने त्यांची संख्या व दहशत वाढली आहे. रात्रीच्या व भरदुपारच्या वेळी ते समूहाने फिरत असल्याने ठिकठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. एकटी महिला दिसल्यानंतर ते अश्लील हातवारे करतात. त्यामुळे यापुढे गावात परप्रांतीय विक्रेत्यांना पूर्णपणे अटकाव करावा. तसेच ज्या घरमालकाकडे ते राहत असतील त्यांना तत्काळ खोली खाली करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
गावात परप्रांतीय फेरीवाल्यांना फिरण्यास बंदी असल्याचे बॅनर लावावेत. गावात फेरीवाले फिरताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर २६ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
