महामार्गावर ‘आपत्ती’ घडूनही महामार्ग विभागाची अनास्था…

कळवूनही हजर नाही तर सा.बा. विभागाचे पठडीतले उत्तर:महामार्गावर तहलसीलदारानी घेतली रंगीत तालीम..

⚡कुडाळ ता.३०-: एखादी अचानक आपत्ती आली तर संबंधित यंत्रणा किती अलर्ट आहेत आणि किती वेळात घटनास्थळी पोहोचतात याची रंगीत तालीम आज कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी घेतली. या परीक्षेत ज्या ठिकाणी अपत्त्ती घडल्याचे कळविण्यात आले होते तो महामार्ग विभाग मात्र यात सपशेल फेल झाला. महामार्ग विभागाचे कोणीच अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी फिरकलेसुद्धा नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ कार्यालयालने आमच्या अखत्यारीत हा भाग येत नाही असे कळविले. त्यामुळे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालिन परिस्थिती ओढवल्याचे कळवूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी किंवा त्यांचे पथक घटनास्थळी अनुपस्थित राहिल्याने नाराजी व्यक्त केली.
शुक्रवारी, सायंकाळी ४.३० ते ५.३० या कालावधीमध्‍ये तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्‍तरीय नैसर्गिक आपत्‍तीच्‍या अनुषंगाने रंगीत तालीम मुंबई- गोवा महामार्गावर कुडाळ येथे हॉटेल लेमनग्रास समोर आयोजित करण्यात आली होती. रंगीत तालीम दरम्यान सहायक महसूल अधिकारी श्रीमती नीता पवार यांनी तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षातून सर्व यंत्रणांना घडलेल्या घटने संदर्भात माहिती देऊन समन्वय साधला. त्याला प्रतिसाद देत पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम ६ मिनिटात पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाचे प्रमुख अग्निशमन विमोचक प्रमोद परब हे पथकासह आणि अग्निशामक बंबासह ९ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ आग विझवली. नगरपंचायत विभागाचे गजानन पेडणेकर, हे फायर बाईकसह तसेच संजय टेबुलकर पथकासह १४ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक राघोजी चेंदवणकर, आरोग्य सेवक रविंद्र गावडे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूरची ऍम्ब्युलन्स व आरोग्य पथक डॉ. कविता पराडकर, नर्स श्रीम, टेमकर यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्याच बरोबर निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, महसूल नायब तहसीलदार संजय गवस, नायब तहसीलदार प्रमोद पिळणकर, मंडळ अधिकारी श्री गुरव, ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी घटना स्थळी धाव घेतली.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविल्यावर त्यांनी मात्र घटनास्थळ या विभागाच्या अखत्यारीत येत नसून राष्ट्रीय महामार्ग विभागाला कळविणेस सांगितले. पण राष्ट्रीय महामार्ग विभागाला कळवूनही त्यांचा अधिकारी किंवा पथक उपस्थित नव्हते. कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, इतर सर्व यंत्रणा घटनास्थळी वेळीच उपस्थित झालेबाबत सर्वांचे आभार मानून आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यानंतरही असाच सर्वानी प्रतिसाद दयावा असे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हि तर रंगीत तालीम होती. पण उद्या एखादी खरीच आपत्ती ओढवली तर राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची हीच प्रतिक्रिया असेल तर मात्र कठीण आहे, अशीच प्रतिक्रिया उपस्थित लोकांमधून उमटली.

You cannot copy content of this page