पालकमंत्री नितेश राणे:दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न..
ओरोस ता ३०
शिक्षण क्षेत्रातून जिल्ह्याचा विकास होवू शकतो, ही गरज खा नारायण राणे यांनी सर्वच शिक्षण सुविधा जिल्ह्यात उभ्या केल्या आहेत. आज आपला जिल्हा दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालात राज्यात प्रथम येतं आहे. १०० टक्के गुण येथील विद्यार्थी मिळवीत आहेत. या यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना व्यवसायांच्या माध्यमातून नोकऱ्या देणारे बनविण्यासाठी आवश्यक सुविधायुक्त वातावरण आपण जिल्ह्यात निर्माण करू, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार प्रसंगी बोलताना केले.
जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात शुक्रवारी दुपारी हा कार्यक्रम पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ माणिक दिवे, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, शिक्षणाधिकारी कविता शिंपी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि लॅपटॉप देवून करण्यात आला.
