आम. निलेश राणे :मालवणात तीन विकासकामांचे भूमिपूजन संपन्न..
⚡मालवण ता.१८-:
मालवण शहरातील महत्त्वपूर्ण पर्यटन व सांस्कृतिक स्थळांच्या सुशोभिकरणासाठी सुमारे १३ कोटी रुपयांच्या निधीतून हाती घेण्यात येणाऱ्या रॉक गार्डनचे सुशोभीकरण, गवंडीवाडा येथे मालवण नगरपरिषद नमो उद्यान आणि मामा वरेरकर नाट्यगृह सुशोभीकरण या तीन कामांचा भूमिपूजन सोहळा आज आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मालवण शहर हे एकविसाव्या शतकातील शहर वाटावे या दृष्टीने शहराचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, निवडणुकीत जे शब्द दिले त्याच्या पेक्षा जास्त काहीतरी मालवण शहराला देण्याचा प्रयत्न आपला आहे, असे यावेळी आम. निलेश राणे यांनी सांगितले.
यावेळी रॉक गार्डनचे सुशोभीकरण, नमो उद्यान आणि मामा वरेरकर नाट्यगृह सुशोभीकरण या तीन कामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते तसेच आम. निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर, उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर, नगरसेविका नीना मुंबरकर, भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, नगरसेवक महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव, महेश कांदळगावकर, रविकिरण तोरसकर, ललित चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, माधुरी मेस्त्री, मनमोहन वराडकर, राजु बिडये, भाऊ मोर्जे, बाबा परब, किसन मांजरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक जगदीश गावकर, जॉन नरोना यांच्यासह इतर कार्यकर्ते, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
मामा वरेरकर नाट्यगृह सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन निमित्त आयोजित कार्यक्रमात शिवराज भूषण या नाटकातील कलावंतांच्या वतीने आम. निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवराज मंचचे अध्यक्ष भूषण साटम, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, भाऊ सामंत, माजी नगरसेविका पूजा सरकारे, संजय शिंदे, समीर शिंदे आदी व इतर कलाकार उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत यांनी विकास कसा करायचा असतो हे आमदार निलेश राणे यांनी दाखवून दिले आहे, निवडणुकीत जे शब्द दिले त्याच्या दुप्पट कामे करण्यासाठी आम. राणे यांनी निधी दिला आहे. नाट्यगृह दुरुस्ती, देवबाग व दांडी बंधारा, कुंभारमाठ मालवण बायपास रस्ता अशी दूरदृष्टी असलेली कामे आम. राणे करत आहेत असे सांगितले. तर नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी आम. निलेश राणे यांच्यामुळेच शहर विकासासाठी निधी मिळत आहे, विकासाच्या या प्रवासात आम. राणे खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत, असे सांगितले. तर पूनम चव्हाण यांनी आम. राणे दिलेला शब्द पूर्ण करत असून त्यांनी आणलेला निधी आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे सांगितले. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.
