Headlines

पीकविमा नक्की कोणाच्या फायद्यासाठी, शेतकऱ्यांच्या की विमा कंपन्यांच्या ?

मालवणातील बैठकीत आंबा काजू उत्पादकांचा सवाल..

⚡मालवण ता.१८-:
खराब हवामानामुळे यावर्षी आंबा व काजूचे उत्पादन कमी झाले असताना विमा कंपनीने नुकसान भरपाई मधून मालवण तालुक्यातील काही गावे वगळल्याबाबत तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक आक्रमक बनले आहेत. या पार्श्वभूमीवर आंबा व काजू उत्पादकांच्या मागणीनुसार आज मालवण तहसीलदार कार्यालयात तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व विमा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पीकविमा हा नक्की कोणाच्या फायद्यासाठी आहे, शेतकऱ्यांच्या की विमा कंपन्यांच्या ? असा सवाल आंबा व काजू उत्पादकांनी विचारला. चर्चेअंती कृषी विभागाने त्या त्या भागातील हवामान मोजमाप यंत्र व विमा यांचा अहवाल बनवून सादर करावा, अशी सूचना तहसीलदार गणेश लव्हे यांनी केली.

या बैठकीस तहसीलदार गणेश लव्हे, कृषी अधिकारी अर्जुन जाधव, कृषी मंडळ अधिकारी, स्कायमेट जिल्हा प्रतिनिधी सुमित पाटील, जिल्हा विमा प्रतिनिधी सिद्धेश येडवे, अन्य अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघाचे अध्यक्ष संजय नरे, उपाध्यक्ष संदेश मालवणकर, सचिव रत्नाकर कोळंबकर, संचालक अनिकेत फाटक, आपा चव्हाण, निना मुंबरकर, शेतकरी श्री तपस्वी मयेकर, बाळा सामंत, बाबू कांबळी, सुनील चव्हाण, अरुण भोगले, संतोष चव्हाण, महेश गावकर व अन्य शेतकरी उपस्थित होते.

या बैठकीत आंबा व काजू उत्पादकांनी विविध मुद्दे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. मालवण तालुक्यातील ज्या वेदर स्टेशनचे ट्रिगर पडलेले नाही त्यांना जवळच्या महसूल मंडळातील वेदर स्टेशनचा डाटा वापरून नुकसान भरपाई देण्यात यावी. उदाहरणार्थ सुकळवाड, पेंडूर आणि श्रावण या मंडळांना ६८०००/- रु. नुकसान भरपाई मिळाली आहे, त्याप्रमाणे इतर म्हणजेच आंबेरी मालवण, आचरा, कोळंब या मंडळातही सारखीच म्हणजे ६८,०००/- नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात. या मागणीवर सकरात्मक चर्चा झाली.

तसेच ज्या मंडळामध्ये नवीन वेदर स्टेशन्स मंजूर झाले आहेत ते लवकरात लवकर बसवण्यात यावीत, विमा कालावधी १५ मे ऐवजी पूर्वीप्रमाणे ३१ मे करण्यात यावा. तसेच जुन्या निकषाप्रमाणे शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळत होती ती बंद झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत त्यामुळे ३ वर्षापूर्वी जे निकष होते तेच लागू करण्यात यावेत, अशा मागण्या यावेळी उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या. तसेच आंबा व्यावसायिक अथवा आंबा बागायतदार यांना पॅक हाऊस व अन्य बांधकामा संदर्भात अकृषिक परवाना (N. A.) करण्याबाबत अडचणी येतात, त्याविषयी देखील या बैठकीत चर्चा झाली.

चर्चेअंती तहसीलदार गणेश लव्हे यांनी कृषी विभागास सूचना करताना हवामान मोजमाप यंत्र व विमा या संदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितले, तसेच हा अहवाल जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी तसेच वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

You cannot copy content of this page