Headlines

खनिज ड्रोन सर्वेक्षणाविरोधात आजगाव ते आरवलीपर्यंत महामोर्चा…

मंगळवारी निघणाऱ्या रॅलीत सर्वपक्षीयांसह निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे; संजू परब यांचे आवाहन — केसरकर, निलेश राणेंच्या उपस्थितीसाठी प्रयत्न..

सावंतवाडी : आजगावसह दशक्रोशीतील १८ गावात होणाऱ्या खनिज ड्रोन सर्वेक्षणा विरोधात आजगाव वेतोबा मंदिरात आज बैठक झाली. यावेळी येत्या मंगळवारी आजगाव वेतोबा मंदिर ते आरवली वेतोबा मंदिरापर्यंत सर्व्हेक्षणा विरोधात रॅली काढण्यात येणार असून यावेळी सर्वपक्षीयांसह निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले. तसेच ग्रामस्थांच्या विनंतीप्रमाणे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे देखील यावेळी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन श्री. परब यांनी ग्रामस्थांना दिले‌

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. परब म्हणाले, वेतोबाच्या नेतृत्वाखाली आपले राजकीय विचार बाजूला ठेवून निसर्गाचा रक्षणासाठी आपण एकत्र आलोत. या लढ्यात सर्वांना संघटित राहायचं असून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांनी देखील इथे यावं अशी मागणी ग्रामस्थांची आहे‌. मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्याशीही संपर्क होत आहे. वेतोबाच लक्ष सर्वांवर असून मंगळवारी याविरोधात होणाऱ्या आजगाव वेतोबा मंदिर ते आरवली वेतोबा मंदिरापर्यंत होणाऱ्या या रॅलीला दीपक केसरकर, निलेश राणेंना आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील. १० गाव सर्वेक्षण क्षेत्रात असली तरी जिल्हाभरातून लोक यात सहभागी होतील. देवभूमी टीकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. चार दिवसांत घराघरात हा संदेश पोहचवा. सर्वपक्षातील लोक हा निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी एकत्र आलेत. आम्ही शांततेत विरोध करत असताना जर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी कोकणी बाणा दाखवून देऊ असा इशारा श्री. परब यांनी दिला.

दरम्यान, निसर्गाच ओरबाडण रोखण्यासाठी मनसे ग्रामस्थांसह आहे. मंगळवारी सायंकाळी होणाऱ्या मोर्चाला राज ठाकरे यांनी संबोधित करावं असंही नियोजन सुरू आहे अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी दिली. तर लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळत असून या रॅलीला सर्वपक्षीय उपस्थित राहतील. हा लढा तुमच्या गावाचा आहे असं समजून सहभागी व्हा, असे आवाहन ॲड. स्वप्नील प्रभूआजगावर यांनी केले. तसेच निसर्गसंपन्न आमचं गाव असून आंबा, काजू आदी फळबागायत इथे आहे. हा विध्वंस झाल्यास इथला जलस्रोत खराब होणार आहे. त्यामुळे खाण प्रकल्प इथे नको आहे असं मत आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांनी व्यक्त केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, संघर्ष समिती अध्यक्ष अजित नातू, ॲड. स्वप्नील प्रभूआजगावर, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, रूपेश धर्णे, सचिन प्रभू, अमित प्रभू, सागर नाणोसकर, सिद्धेश परब, सुरज परब, देव्या सुर्याजी, मिलिंद सावंत, जितेंद्र मोरजकर, आबा चिपकर, नील प्रभू झांटये, रामचंद्र ऊर्फ अण्णा झाटये, श्रीनाथ केदार, रवींद्र धर्णे, सतीश आकेरकर, राजेश आजगावकर, सौरभ वराडकर, शुभम जोशी, जय केदार, हरेश वरडाकर, गोविंद वैज, संदेश वैज, सावळाराम केदार, आबा केदार, अभी केदार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page