नगरसेवक तपस्वी मयेकर यांच्याकडून डम्पिंग ग्राउंडचा स्पॉट पंचनामा..
⚡मालवण ता.१८-:
मालवणमधील ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी आज शहरातील आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंडच्या दुरावस्थेचा व्हिडीओ बनवून ऑन दि स्पॉट पंचनामा केला. डम्पिंग ग्राउंड मध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा उघड्यावर पडलेला असून तो कचरा गायी गुरे खात असल्याचे तसेच कचरा विलगीकरण न करता थेट जाळला जात असल्याचे गंभीर दृश्य डम्पिंग ग्राउंड मध्ये दिसून आल्याने नगरसेवक श्री. मयेकर यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी काय करत आहेत? नगरपालिका वार्षिक २ कोटी निधी कचरा जाळण्यासाठी खर्च करत आहे का? असे संतप्त सवाल उपस्थित केले आहेत.
मालवण वायरी भागाचे नगरसेवक असलेल्या तपस्वी मयेकर यांच्या प्रभागात नगरपालिकेचा कचरा उचल करणारा ट्रॅक्टर गेले काही दिवस येत नसल्याने श्री. मयेकर यांनी आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन पाहणी केली. यावेळी डम्पिंग ग्राउंडची झालेली दुरावस्था श्री. मयेकर यांनी मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडीओद्वारे कैद करत सोशल मीडियावर पोस्ट करत नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
डम्पिंग ग्राउंड मध्ये मोठ्याप्रमाणावर कचरा विलगीकरण न करता उघड्यावर टाकलेला आहे. तेथे कोणीही कर्मचारी दिसून आला नाही. डम्पिंग ग्राउंडला गेट नसल्याने अनेक गुरे डम्पिंग ग्राउंड मध्ये शिरत असून गुरे कचरा खात असल्याचे दिसून आले. कचरा खाल्ल्यामुळे गुरांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे तपस्वी मयेकर यांनी सांगितले. तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा जाळला जात असून यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे असेही श्री मयेकर यांनी सांगितले. नगरपालिका कचरा व्यवस्थापनासाठी वार्षिक २ कोटीची तरतूद करत असताना कचरा जाळला का जातोय, डम्पिंग ग्राउंडची दुरावस्था का झालीय असे सवाल श्री. मयेकर यांनी उपास्थित केले. तसेच डम्पिंग ग्राउंडची एवढी दुरावस्था झाली असताना नगरपालिका प्रशासन काय करत आहे, नगरपालिकेतील सत्ताधारी काय करत आहेत असे सवलाही श्री . मयेकर यांनी उपस्थित केले आहेत.
