Headlines

आसोली न्हैचिआड येथे मायनिंग सदृश्य परीक्षण…?

गावात एकच खळबळ: पोलीस घटनास्थळी दाखल होत संबंधितांना ताब्यात घेऊन गुन्हे केले दाखल..

⚡वेंगुर्ले ता.१८-: सध्या आजगाव दशक्रोशीत मायनिंग प्रकल्प प्रकरण तापलं असतानाच, वेंगुर्ले तालुक्यातील आसोली न्हैचिआड परिसरात आज सकाळी साडे दहाच्या सुमारास एका पथकाने गावात परीक्षण बाबत कल्पना न देताच तसेच स्थानिकांना अंधारात ठेवून न्हैचीआड परिसरात तीन ते चार ठिकाणी मायनिंग सदृश्य मातीचे परीक्षण केल्याने एकच खळबळ उडाली.

येथील ग्रामस्थ अविनाश महादेव पाटील यांच्या घराशेजारी त्यांच्या जागेत हे माती परीक्षण करण्यात येत होते.सदरील आसाम येथील कंपनीचं हे पथक श्री.पाटील यांच्या घराशेजारील जमिनीकडे जाऊन खोदकाम करत असल्याच्या आवाजाने ,श्री .पाटील यांनी तेथे जात याविषयी विचारणा केली,मात्र तेथील पथकाने त्यांना पाणी परीक्षण करतो असे सांगितले.मात्र श्री .पाटील यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी लागलीच तेथील ग्रामस्थांना तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे,पंचायत समिती सदस्य संकेत धुरी यांना याची माहिती दिली.यावेळी या सर्वांनी घटना स्थळी धाव घेत.संबंधित परीक्षण करणाऱ्या पथकाला धारेवर धरलं.यावेळी पहिल्यांदा त्यांनी धातूरमातूर उत्तरे दिली.मात्र ग्रामस्थांचा रोष पहातां ते निरुत्तर झाले.

या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलीस दाखल होत,या पथकाला ताब्यात घेत तसेच त्यांच्याकडील सहित्य जप्त करून त्यांना वेंगुर्ले पोलीस ठाण्यात हजर करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

सदरील घटनेची वेंगुर्ले पोलीस चौकशी करत असून,या घडलेल्या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडीस आले असून,आपल्या गावात विनाशकारी मायनिंग प्रकल्प नकोच असल्याची भावना यावेळी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

संबंधित कंपनीच्या पथकाला ग्रामस्थानी धारेवर धरले तेव्हा त्यांनी तेथील एका जवळच्या गावातील व्यक्तीने आपल्याला परीक्षण साठी जागा सांगितल्याचे सांगितले.मात्र गावातील ग्रामस्थांना अंधारात ठेवून गावाबाहेरील व्यक्ती त्यांना काम करायला सांगते? याचे गौडबंगालं काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

You cannot copy content of this page