जास्त तास विद्युत पुरवठा खंडित ठेवू नका…

पालकमंत्री:महावितरण कार्यालयाला पालकमंत्री नितेश राणे यांची अचानक भेट,नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना..

⚡कुडाळ ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश आणि यांनी आज (शुक्रवारी) भेट दिली. वीज पुरवठा जास्त वेळ खंडित ठेवू नका असे सक्त निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचीही माहिती घेतली. कामकाजामध्ये सुधारणा करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे अनेक गाव विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे काळोखात राहिले. या घटनेची पालकमंत्री नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली. विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना तात्काळ नियंत्रण कक्ष स्थापन करून यामध्ये आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान हा कक्ष कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालय येथे उभारण्यात आला आहे आणि या कक्षामध्ये कशाप्रकारे काम चालू आहे, याची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आज (शुक्रवारी) नियंत्रण कक्षाला भेट दिली. या कक्षामध्ये दाखल झालेल्या तक्रारी आणि त्यांचे किती तासाने निरासन झाले याची विचारणा करून तक्रारी असलेल्या पुस्तकाची पडताळणी केली. तसेच ऑनलाईन असलेल्या तक्रारीची माहिती घेतली.
यावेळी कार्यकारी अभियंता वनमोरे यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या. या नियंत्रण कक्षाचे कामकाज अजून सुधारले पाहिजे. आलेली तक्रार संबंधितांपर्यंत तात्काळ जाणे अपेक्षित आहे. यामध्ये कोणताही विलंब होऊ देऊ नका. तसेच तासान तास विद्युत पुरवठा खंडित राहू नये याकडे लक्ष द्या, अशा सूचना दिल्या.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page