आमदार दीपक केसरकर:आजगाववासीयांच्या पाठीशी ठाम; नळ पाणी योजनेचे काम जर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू..
सावंतवाडी ता. १९ : स्थानिक नागरिकांना जे प्रकल्प हवे असतील, तेच प्रकल्प या भागात आले पाहिजेत. लोकांच्या विरोधात जाऊन कोणताही प्रकल्प लादला जाऊ नये, अशी भूमिका आमदार दीपक केसरकर यांनी आज स्पष्ट केली. तसेच ज्यांना प्रकल्प हवे असतील त्यांनी आपल्या गावात ते राबवावेत, त्याला आपला विरोध नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आजगाव परिसरातील प्रस्तावित खनिज सर्वेक्षणाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, आजगावमध्ये मायनिंगविरोधात सुरू असलेला आक्रोश थांबला पाहिजे. लोकांच्या भावना लक्षात न घेता कोणतेही विनाशकारी प्रकल्प या भागात येऊ नयेत, ही माझीही भूमिका आहे. मी पूर्णपणे आजगाववासीयांच्या पाठीशी आहे.
आजगाव येथील आंदोलनादरम्यान काही नागरिक व युवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमुळे युवकांच्या भविष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी हे गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, खनिज सर्वेक्षण झाले म्हणजे लगेच प्रकल्प होणार, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. चुकीची माहिती पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. या संपूर्ण प्रक्रियेत आम्ही जनतेच्या सोबत आहोत.
दरम्यान, सावंतवाडी शहराच्या ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही केसरकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, योजनेत कोणताही गैरप्रकार होऊ दिला जाणार नाही. कामामध्ये काही चुकीचे आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असून, कामाची गुणवत्ता राखण्यास प्राधान्य दिले जाईल.
