अन्यथा वायरी तारकर्ली देवबाग रस्त्यावर ‘झाडे लावा जाडे जगवा’ आंदोलन छेडू:हरी खोबरेकर यांचा इशारा…

⚡मालवण ता.२७-:
मालवण तालुक्यातील वायरी तारकर्ली देवबाग या रस्त्यावर भूमिगत वीज लाईनसाठी खोदाई करण्यात आल्यानंतर या रस्त्याच्या बाजूला खड्डे निर्माण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी खराब बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे, अन्यथा ठाकरे शिवसेनेकडून या खड्ड्यांमध्ये झाडे लावा झाडे जगवा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

याबाबत हरी खोबरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. वायरी तारकर्ली देवबाग हा मुख्य मार्ग असून या मार्गावर भूमिगत वीज लाईनचे काम करताना रस्त्याची खोदाई करण्यात आली. यामुळे या रस्त्याची साईडपट्टी खराब होऊन रस्त्याच्या बाजूला खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खरं बनला असून अनेक वाहन चालकांचे अपघात या मार्गावर झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करून रस्ता सुस्थितीत करण्यात यावा. हे खड्डे त्वरित न बुजविल्यास त्याच खड्ड्यामध्ये ‘झाडे लावा झाडे जगवा’ आंदोलन छेडण्यात येईल, असे हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page