सावंतवाडी : शहराच हृदय मानलं जाणाऱ्या ऐतिहासिक मोती तलावात ड्रेनेजच पाणी सोडल जात असल्याने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी सत्ताधारी व प्रशासनावर तोफ डागली होती. तसेच मोती तलाव वाचवण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. यानंतर खडबडून जागे झालेल्या नगरपरिषद प्रशासनाकडून तलावाच्या स्वच्छतेला प्रारंभ करण्यात आला आहे.
ऐतिहासिक मोती तलावात ड्रेनेजच पाणी सोडलं जात असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष श्री. परब यांनी केला होता. यानंतर जाग आलेल्या न.प. प्रशासनाकडून संबंधित संकुलांसह तलाव शेजारील दुकान व्यावसायिकांना नोटीसा देत २० हजार रुपयांचा दंडही बजावण्यात आला. यातच नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजू परब यांनी सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसल्याने मोती तलाव वाचवण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. स्थानिक आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाव स्वच्छतेसाठी पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले. यानंतर नगरपरिषद प्रशासनाकडून मोती तलावाची प्रत्यक्ष स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. तलावातील झाडी स्वच्छ करत पाणी हलत राहण्यासाठी बसविण्यात आलेल्या मशीन देखील सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, येथील मिहीर मठकर यांनी ‘मोती तलाव बोलतोय’ अशा आशयाचा व्हिडिओ तयार करत तालावाची व्यथा मांडली होती. याला देखील सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला असून तलाव स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर केलेली कारवाई अन् स्वच्छतेचा शुभारंभ यामुळे सावंतवाडीकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

