पाण्याखाली जात असल्याने कॉजवेचा पर्यायही कुचकामी..
कुडाळ : तालुक्यात गेले चार दिवस अचानक सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. माणगांव शिवापूर मार्गावरील सुमारे साडेतीन कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या पुलाचे काम अपूर्ण राहिले, तर येथील जुन्या कॉजवेवर पहिल्याच पावसात पाणी आल्यामुळे दुकानवाडच्या पुढील पाच गावांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्याच पावसात दुकानवाड येथील जुन्या कॉजवेवर पाणी आल्याने या भागातील ग्रामस्थांवर चिंतेचे सावट पसरले आहेत.
माणगाव शिवापूर या मुख्य मार्गावर सुमारे साडेतीन कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या पुलाचे काम दोन महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले. सुरुवातीला ठेकेदारने चांगल्या पद्धतीने पुलाच्या कामाला गती दिली, मात्र अलीकडे गेले पंधरा दिवस पुलाचे काम काहीअंशी संथगतीने सुरू राहिले. अशातच मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे कर्ली नदी प्रवाहित झाली. ते पाणी जुन्या कॉजेवरून वाहू लागले. नवीन पुलाचे बांधकाम अपूर्ण राहिल्यामुळे त्या पुलावरून वाहतूक होणे अशक्यच आहे, परिणामी जुन्या कॉजवेचा आधार घ्यावा लागणार आहे. मात्र जुन्या कॉजवेच्या वरच्या बाजूला नवीन पुलाचे बांधकाम व त्या पुलाच्या बांधकामाचे भराव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जुना कॉजवे वारंवार पाण्याखाली राहणार आणि दुकानवाड कॉजेवेच्या पलीकडे असणाऱ्या शिवापूर, वसोली, आंजिवडे, उपवडे, साकिर्डे या गावातील लोकांची पायपीट निश्चित मानली जात आहे. यामध्ये शाळकरी मुले, महिला व वृद्धांचे हाल होणार असल्यामुळे या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
