गोव्यात १७ पासून सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव…

सनातन संस्थेचे आयोजन:सिंधुदुर्गातुन १५०० हुन अधिक हिंदू उपस्थित राहणार..

कुडाळ : सनातन राष्ट्राचा उद्घोष, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच २५ हजारांहून साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल. या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १५०० हून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदु उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक अभय वर्तक यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव बाबत माहिती देण्यासाठी कुडाळ येथील हॉटेल कोकण स्पाईस येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्‌गुरु सत्यवान कदम, राजेंद्र पाटील, हिंदुंत्ववादी विवेक पंडित आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अभय वर्तक यांनी सांगितले की, सनातन संस्थेच्या या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपण देशात रामराज्य-स्वरूप ‘सनातन राष्ट्रा’ साठी सामूहिक संकल्प केला आहे. यातून सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. सध्याच्या भारतासमोर उभ्या असलेल्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्याची मूल्ये आणि त्याचे रक्षण नितांत आवश्यक झाले आहे. एकूणच गो, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणाऱ्या ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणारा लोकोत्सव धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित करणारा ठरणार आहे.
महोत्सवाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, पतंजली योगपीठाचे संस्थापक प.पू. योगऋषि स्वामी रामदेवजी, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूरजी महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे अधिवक्ता विष्णू जैन, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना सद्गुरू सत्यवान कदम यांनी सांगितले की, या महोत्सवामध्ये समर्थ रामदास स्वामी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांचे गुरू प. पू. भक्तराज महाराज, सज्जनगडचे श्रीधरस्वामी , श्री कानिफनाथ स्वामी, माणगाव येथील टेब्ये स्वामी महाराज,, श्री साईबाबा, प. पू. गोंदवलेकर महाराज,गगनगिरी महाराज यांसह १० हून अधिक संतांच्या पादुकांचे एकत्रित दर्शन घेता येणार आहे. रामराज्याच्या संकल्पासाठी १ कोटी नामजपयज्ञ होणार आहे असे सांगितले. यावेळी बोलताना विवेक पंडीत यांनी सांगितले की, हिंदूत्वाच्या वाणीत सर्व समाजाचे कल्याण आहे. हिंदू धर्मामुळे सर्व देशात सलोखा निर्माण सर्वानाच पुढे घेऊन जाता येणार आहे. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यामध्ये हिंदू धर्मासाठी झोकून देऊन कार्य करणाऱ्यांना हिंदू विरांना हिंदू राष्ट्ररत्न व सनातन धर्मश्री हा पुरस्कार संतांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रांस्रे, तसेच सनातन संस्कृती, राष्ट्र कला आयुर्वेद , अध्यात्मिक वस्तू या़ंचे प्रदर्शन असणार आहे. अशी माहिती विवेक पंडित यांनी दिली.
यावेळी बोलताना राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, राष्ट्राच्या उत्कर्षाचा हिंदू राष्ट्र हा एकमेव उपाय आहे. हिंदू राष्ट्र झाले तरच धर्माधिष्ठित जीवन जगता येणार आहे. या अनुषंगाने या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात हिंदू राष्ट्राच्या ध्वजाचे अवतरण होणार आहे. देशभरातील संतांच्या वाणीतून सनातन राष्ट्राचा उद्घोष करण्यासाठी संतसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १९ मे रोजी विश्वकल्याणार्थ तसेच हिंदुत्ववांच्या आरोग्यासाठी महाधन्वंतरी यज्ञ होणार आहे असे सांगितले.

You cannot copy content of this page