आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्त्यांना आवाहन:मुस्लिम समाजाला टार्गेट करणे चुकीचे असल्याचा पुनरुच्चार..
कुडाळ : मागील पराभवाची मरगळ झटकून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्याचे या पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आज मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कुडाळ येथील हॉटेल लेमन ग्रास येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी व कार्यकर्ता बैठक राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक बशीर मुर्तजा, सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्य मंत्री प्रवीण भोसले, प्रांतीक सदस्य प्रसाद रेगे, कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, राज्य उपाध्यक्षा नम्रता कुबल व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री आव्हाड यांनी सांगितले की, कोकण दौऱ्याचा शुभारंभ कुडाळ येथून करण्यात आला. आज झालेल्या बैठकीत अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी व उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसला. झालेल्या पराभवाच्या नैराश्येतून कार्यकर्ते बाहेर पडलेले दिसत आहेत. नैराश्य कार्यकर्त्यांनाही होते तसे ते आपल्यालाही होते. पण यातून सर्व जण पुन्हा एखदा उभे राहताना दिसत आहेत. आपण सर्वचजण शरद पवार यांच्या दहशतविरोधी विचारांवर व संविधानप्रेमी आहोत. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत.सर्वानी आता पक्षबांधणीच्या कामाला लागावे. आपण केलेली विनंती सर्वानी मान्य केली आहे. जे झाले ते विसरून पक्षसंघटना मजबूत करू व स्थानिक स्वराज्य निवडणुकीत हातात हात घालून काम करू असा विश्वासही यावेळी व्यक्त केला आहे.
श्री. आव्हाढ पुढे म्हणाले, इतिहासाचे पहिले पानही न वाचलेले आज ईतिहासावर बोलून लोकांची मने कलुषित करत आहेत. या देशात धर्म द्वेषाचा ज्वर समाजवादी विचारांची भूमी असलेल्या नाथ पै, मधु दंडवते यांच्या भूमीतूनच पसरवला जात आहे,आज मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुस्लिम समाजाची आज केली जात असलेली आर्थिक गळगेपी सरकार पुरस्कृत असेल तर ते चुकीचे आहे. औरंगजेब ही आमच्या शौर्याची ओळख आहे असे उघडपणाने विधानसभेत म्हणणारा पहिला मी होतो. आमच्या महाराजांचे शौर्य आमच्या शंभुराजांचे शौर्य ही ओळख आहे समाजामध्ये द्वेशाचे वितुष्ट आणून व दरी पाडूनकाही साध्य होणार नाही.. सद्यस्थितीत महागाई , स्रीअत्याचार यांचा कळस आहे. या सर्वांवर पांघरूण घालण्यासाठी हिंदू मुसलमान यांचा वापर होत असेल तर ते चुकीचे आहे.धर्मनिरपेक्ष भारतात धर्मनिरपेक्ष संविधान असतांना धर्मनिरपेक्षता हा आमचा आत्मा असलाच पाहिजे. मुस्लिम समाजाला जाणून बूजून निशाण्यावर ठेवून तुमचे राजकीय हित साधण्यासाठी देशाचे तुकडे करू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
