राणेंनी एकनाथ शिंदेंना शंभर वेळा भेटण्यामागचे कारण जाहीर करावे…

परशुराम उपरकर:राणे हे भाजपाचे खासदार आहेत की शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख…?

कणकवली : भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत कोणालाही प्रवेश देण्यासाठी आपली परवानगी आवश्यक असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर माजी आमदार परशूराम उपरकर यांनी राणेंवर जोरदार टीका करत त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राणे हे भाजपाचे खासदार आहेत की शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख? असा गैरसमज निर्माण होत असल्याचा टोला उपरकरांनी लगावला. कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.उपरकर बोलत होते. ते म्‍हणाले, राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शंभर वेळा भेटण्यामागचे कारण जनतेसमोर जाहीर करावे. “राणे शिंदे शिवसेनेत प्रवेशासाठी संपर्कप्रमुख आहेत का? की त्यांच्या थोरल्या मुलाच्या नीलेश राणे राजकीय पुनर्वसनासाठी या भेटी होत्या? याची उत्तरे राणेंनी द्यावीत,” असे उपरकर म्हणाले. शेतकऱ्यांची अडीच कोटींची थकबाकी कधी देणार? उपरकरांनी राणेंवर आणखी एक गंभीर आरोप केला. राणेंनी काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात आणलेल्या दूध डेअरीने शेतकऱ्यांकडून दूध घेऊन अडीच कोटी रुपये थकवले असून, ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. “करंजे येथे गोशाळा सुरू करण्यापूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांचे हे पैसे वसूल करून द्यावेत,” अशी मागणी उपरकरांनी केली. नितेश राणे यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती, तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही, असे उपरकर म्हणाले. उपरकरांनी राणेंच्या राजकीय प्रवासावरही भाष्य केले. २००५ च्या पोटनिवडणुकीत राणेंना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि ठाण्यातील शिवसैनिक कोकणात आले होते. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर राणे कॉंग्रेस नेत्या प्रभा राव, शरद पवार आणि गुजरातमधील नेत्यांना भेटत होते. मनी लॉंड्रींग प्रकरणात अडकल्यावर भाजपात प्रवेशासाठी राणेंनी काय काय केले, हे आम्हाला माहीत आहे,” असा घणाघात उपरकरांनी केला. राणेंचे पक्षांतर स्वार्थासाठी होते, असा आरोप त्यांनी केला. उपरकर म्‍हणाले, “नितेश यांचा भाजपा प्रवेश होताना राणेंना देवेंद्र फडणवीसांनी किती वेळ थांबवले होते हे आठवावे. शेवटी हा प्रवेश माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते कणकवली भाजप कार्यालयात झाला, हे राणेंनी विसरू नये, ते म्‍हणाले, सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री आणि पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेल्या उदय सामंत यांना कोणाला पक्षात घ्यायचे याचा अधिकार नसेल, तर सामंतांसोबत शिंदे शिवसेनेत गेलेल्या कार्यकर्त्यांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे. दरम्‍यान राणेंनी गोशाळा सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून द्यावेत आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर केल्याचे आरोप खोडून काढावेत असे उपरकर म्हणाले.

You cannot copy content of this page