सावंतवाडी आगारात नवीन गाड्यांच्या उद्घाटनात गोंधळ…

अनुप नाईक: पहिल्याच फेरीत बिघाडामुळे प्रवाशांना फटका..

सावंतवाडी, दि. २९: सावंतवाडी आगारात सोमवार, दिनांक २८ रोजी दाखल झालेल्या नवीन गाड्यांचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून घाईगडबडीत उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र, या घाईगर्दीत गाड्यांची योग्य तपासणी न करताच पाच गाड्यांचे उद्घाटन करून त्यांना विविध मार्गांवर रवाना करण्यात आले. याचा फटका पहिल्याच दिवशी प्रवाशांना बसला.
सावंतवाडी-रत्नागिरी मार्गावर धावणारी एक नवीन गाडी कणकवली स्थानकातून निघाल्यानंतर केवळ दहा किलोमीटरच्या अंतरातच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. यामुळे गाडीतील प्रवाशांना अर्ध्या रस्त्यातच उतरण्याची वेळ आली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या श्रेय लाटण्याच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष श्री अनुप नाईक यांनी केला आहे.

दरम्यान प्रवाशांना मिळेल त्या दुसऱ्या गाडीतून त्यांच्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले, तर बिघडलेली नवीन गाडी दुरुस्तीसाठी कणकवली येथील शोरूममध्ये न्यावी लागली.
पहिल्याच दिवशी झालेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यात दाखल झालेल्या नवीन गाड्यांच्या गुणवत्तेवर आणि भविष्यावर प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या गाड्या खरंच नवीन आहेत की महामंडळाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रकार आहे, असा सवाल ही अनुप नाईक यांनी उपस्थित केला.

You cannot copy content of this page