कणकवली : महावितरणच्या कोकण परिमंडलातील वीजग्राहकांना एप्रिल किंवा मे महिन्याच्या वीज बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल पाठविण्यात येत आहे. ही अतिरिक्त सुरक्षा ठेव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमानुसार असून, सर्व वीजग्राहकांनी या रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनियम १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. या सुरक्षा ठेवीची दरवर्षी पुनर्गणना केली जाते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर, मागील एका वर्षातील ग्राहकांच्या वीज वापराच्या सरासरीनुसार आणि विनियम १३.११ नुसार ग्राहकांनी भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित दरानुसार व्याज (सद्यासाठीचा व्याज दर सहा टक्के) वीज बिलामध्ये समायोजित करून ग्राहकांना परत केले जाते. लघुदाब वीजग्राहकांना ही अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम घरबसल्या भरण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर आणि महावितरणच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.
