नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हा स्थानिक शेतकऱ्यांसाठी मारक असल्याने आमचा पूर्णपणे विरोध…

साईप्रसाद काणेकर: वेळ पडल्यास ठाकरे शिवसेना शेतकऱ्यांसोबत प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू..

⚡बांदा ता.२३-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हा स्थानिक शेतकऱ्यांसाठी मारक असून पर्यावरणाचा देखील ऱ्हास करणारा आहे. या महामार्गाला आमचा पूर्णपणे विरोध असून शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे बांदा शरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी दिला आहे. ठाकरे सेना शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असून प्रसंगी शेतकऱ्यांसोबत प्रशासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू असे काणेकर यांनी सांगितले.

बांदा शहर व परिसरातील ग्रीन कॉरिडॉर मधून शक्तिपीठ महामार्ग हा प्रस्तावित असून यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी शासन अधिग्रहित करणार आहेत. बांदा परिसर हा काजूसाठी समृद्ध असून या ठिकाणी अनेक उन्हाळी व नगदी पिके घेतली जातात. शेतकऱ्यांच्या समृद्ध बागायती नियोजित आराखड्यात असून यामुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. अनेक ठिकाणी या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. ठाकरे सेना शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार असून या महामार्गाच्या विरोधात आमची भूमिका ही शेवटपर्यंत राहील.
बांदा शहरात अनेक तरुणांनी महामार्गलगत उद्योगधंदे उभे केले आहेत. मात्र या नियोजित महामार्गमुळे हे तरुणही विस्थापित होणार आहे. ठाकरे सेना शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी उभी राहणार असल्याचे काणेकर म्हणाले. लवकरच यासंदर्भात बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे.
फोटो:-
साई काणेकर.

You cannot copy content of this page