मिरची उत्पादकांना गोव्यात माल नेण्यासाठी सवलत द्यावी…

शेतकरी पिंट्या परब यांची मागणी

*💫बांदा दि.२५-:* गोवा हद्दीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात मिरची, नाचणी, चवळी, हळसाणे, वाल, भुईमूग अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. बांदा व सावंतवाडी बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतकरी माल गोव्यात विक्रीसाठी नेतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र गोवा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. याचा फटका सध्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गोव्यात मालाची वाहतूक करण्याची परवानगी देण्याची मागणी मडुरा येथील मिरची उत्पादक शेतकरी पिंट्या परब यांनी केली आहे. सावंतवाडी तालुक्यातील बांदा, शेर्ले, मडुरा, सातोसे, न्हावेली, पाडलोस, आरोस, साटेली-सातार्डा, आरोंदा भागात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पन्न घेतले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागूनच गोवा राज्य असल्यामुळे गोव्यात मिरची, नाचणी व इतर कडधान्य पिकांना मोठी मागणी व चांगला दर मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कल आपला माल गोव्यात विक्रीसाठी नेण्याकडे असतो. परंतु सद्यस्थितीत लॉकडाऊन असल्यामुळे महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमा जा-ये करण्यासाठी बंद आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच बांदा व सावंतवाडी बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतीत पिकवलेला माल गोव्यात नेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पिंट्या परब यांनी केली आहे. प्रशासनाने ज्याप्रमाणे गोव्यात नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या युवक युवतींना ग्रामपंचायत दाखला ग्राह्य धरला जाणार त्याच धर्तीवर आम्हा शेतकऱ्यांना सुध्दा शेतीतील माल गोव्यात विक्री करून पुन्हा येण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून हाेत आहे.

You cannot copy content of this page