⚡मालवण ता.०१-:
मालवण तालुक्यातील मसुरे मागवणेवाडी येथील ओमकार संजय दुखंडे (वय १५) हा शाळकरी मुलगा मसुरे रमाई नदीत पोहायला गेला असता सोमवारी दुपारच्या सुमारास त्याचा बुडून मृत्यू झाला.
याबाबतची खबर मागवणे पोलीस पाटील अभिजीत गणेश दुखंडे यांनी मसुरे पोलीस दूरक्षेत्रात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार हा मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलमध्ये नववीत शिकत होता. मसुरे मांगवणेवाडी येथील ओमकार दुखंडे हा आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रमाई नदीपात्रात सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास पोहोण्यासाठी म्हणून बाहेर पडला होता. परंतु दुपारी उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबातील माणसांनी शोधाशोध सुरू केली. तसेच शेजारील महेश वंजारे, प्रवीण चव्हाण, अनिल वंजारे, प्रसाद दुखंडे या ग्रामस्थांनी ओंकार याचा रमाई नदीपात्रात शोध सुरू केला. शोधाशोध करत असताना मागवणे या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास नदीपात्रात ओमकार निपचित पडलेला दिसला. स्थानिक ग्रामस्थांनी त्याला लगेच नदीपात्रातून बाहेर काढत आरोग्य केंद्रात हलविले. मात्र, तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.
ओमकार हा अभ्यासात हुशार होता. कला-क्रीडा क्षेत्रातही तो अग्रेसर असायचा. होळी शिगमोत्सवामध्ये गोमूच्या नाचामध्ये तो गात असलेल्या गाण्यांमुळे संपूर्ण मसुरे परिसरात तो प्रसिद्ध होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. ओमकार याच्या पश्चात आई व बहीण आहे. मागवणे पोलीस पाटील अभिजीत दुखंडे यांचा तो पुतण्या होय.
