Headlines

“भगवान महावीर दवाखाना पुन्हा रुग्णसेवेत…

कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती; आजपासून ओपीडी सुरू

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी नगरपालिकेचा गेल्या १०० वर्षांपासून कार्यरत असलेला भगवान महावीर आयुर्वेदिक व टी.बी. दवाखाना आता पुन्हा कायमस्वरूपी रुग्णसेवेत दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर उपलब्ध नसल्याने या दवाखान्याची सेवा बंद होती. मात्र, नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी दवाखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या माध्यमातून या दवाखान्यात कायमस्वरूपी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवार, १६ ऑक्टोबरपासून दवाखान्यात नियमित ओपीडी सेवा सुरू झाली आहे.

यावेळी नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चव्हाण तसेच स्टाफ नर्स करुणा करमळकर आणि कल्पना संगम यांचे स्वागत केले. दवाखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांचेही यावेळी आभार मानण्यात आले. “सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेच्या हक्काचा हा दवाखाना आहे. तो पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सावंतवाडी नगरपालिका नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी यापुढेही कटिबद्ध राहील,” असे नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी सांगितले. दवाखाना नियमित सुरू राहावा यासाठी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही विशेष प्रयत्न केले. यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला व बालकल्याण सभापती दीपाली भालेकर, प्रतीक बांदेकर, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक यांच्यासह नगरसेवक, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.”

You cannot copy content of this page