⚡बांदा ता.२७-: होळी पौर्णिमेपासुन पंधरा दिवसांनी साजरा होणारा बांदा येथिल शिमगोत्सव गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अबालवृद्धांसह महिलांनीही उत्स्फुर्त सहभाग घेत सप्तरंगांची उधळण केली.
शिमगोत्सवानिमित्त आदल्या दिवशी बुधवारी गांधीचौक मित्रमंडळ व मांडकरी प्रासादिक नाट्यमंडळ, बांदा निर्मित ‘एकदा पहाव करून’ हा स्थानिक कलाकारांचा दोन अंकी धमाल म्युझिकल विनोदी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. गुरुवारी सकाळी बांदा बाजारपेठेतील श्री देव मांडकरी देवस्थान येथे सकाळी वार्षिक धार्मिक कार्यक्रमांना आरंभ झाला. यावेळी देवाला नारळ व गुलाल अर्पण करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मांडावर घुमटाच्या वादनासह विविध पदांचे गायन झाल्यावर विविध पारंपारिक धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर ढोलांच्या तालावर रंगाची उधळण करण्यात आली. मांडावरील हा कार्यक्रम होताच गावात सर्वत्र रंगपंचमी खेळण्यास प्रारंभ झाला.
शहरातील वाडीवाडीत, गल्लोगल्ली तसेच घरोघरी दिवसभर सर्वांनी रंगोत्सव साजरा केला. काही ठिकाणी ढोल ताशे तर काही ठिकाणी डिजेच्या तालावर लोकांनी नृत्याचा आनंद लुटला. सायंकाळी पारंपारिक रोंबाट फेऱ्या होळीचा खुंट येथे पोहोचल्यावर रंगोत्सवाची सांगता झाली. नियोजित रोंबाट फेरीचे दुपारी श्री पाटेश्वर मंदिरकडे मार्गक्रमण झाले. त्यानंतर मांडकरी मंडळी श्री पाटेश्वर मंदिरकडे येऊन पुन्हा होळीकडे एकत्र येत रात्री ८ वाजता एकत्रित धूळ मारण्यात आली. रात्री उशिरा श्री भूमिका मंदिरात भाविकांना व ग्रामस्थांना कळसातील न्हावान देण्यात आले. बांदावासियांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.
फोटो:-
बांदा येथे रंगपंचमी साजरी करताना शहरातील युवक व बालगोपाळ.
बांदा शिमगोत्सव गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा…
