विकास चाळके:नडगिवे तलाठी चाळके पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण ; तहसीलदार कार्यालयात सत्कार
⚡कणकवली ता.२७-: परिस्थितीमुळे तलाठी नोकरीत रूजू झालो असलो तरी शिक्षण घेतानाच मी पोलिस उपनिरीक्षक हे माझे ध्येय निश्चित केले होते. तसे प्रयत्न सातत्याने करीत राहीलो म्हणून आज यश मिळाले. तलाठ्याची नोकरी करताना परीक्षा कालावधीत तहसीलदार देशपांडे व माझे सहकारी यांनी सुट्ट्या न कुरकुरता दिल्या व माझे दफ्तरही सांभाळले. यासाठी मी सर्वांचा कृतज्ञ आहे. त्यांच्या या मदतीचा मोठा सहभाग माझ्या यशात आहे. भविष्यात माझी सेवा सर्वसामान्य नागरिकाना समाधान देणारी व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारी असेल, असे भावोद्गार पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले नडगिवे गावचे तलाठी विकास चाळके यांनी काढले.
कणकवली तहसीलदार कार्यालयातील छोटेखानी कौतुक सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यात तहसीलदार दीक्षांत देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, सर्व कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर म्हणाले, प्रयत्न केले, कष्ट उपसले तर गगनालाही गवसणी घालता येते हे कणकवली तालुक्यातील नडगिवे गावचे तलाठी विकास चाळके यानी दाखवून दिले आहे. परिश्रम करणाऱ्याचे भविष्य नेहमीच उज्ज्वल असते असे गौरवोद्गार काढले.
तहसीलदार दीक्षांत देशपांडे म्हणाले, चाळके कामात चोख असत, त्यांच्याबद्दल कधीही तक्रारी आल्या नाहीत. वेळोवेळी ते आपल्या समस्या, अडचणी मांडत असत आणि त्यांचा वरिष्ठ म्हणून मी त्यांना मार्गदर्शन करत असे. माझ्या कार्यालयातील आणखीही काही कर्मचारी स्पर्धा परीक्षांना बसले असून तेही असेच यश मिळवतील असा मला विश्वास आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ढोर मेहनतीपेक्षा नेमकेपणा, समयसूचकता व तारतम्य आवश्यक असते आणि मग यश तुमच्यापासून दूर पळत नाही. ऑगस्ट २०२४ मध्ये विकास चाळके कणकवली तालुक्यात नडगिवे गावचे तलाठी म्हणून रूजू झाले. आपले नियत कर्तव्य पार पाडत नागरिकांना सेवा देत असताना त्यांचा एम्.पी.एस्.सी.चा पोलिस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास सुरू होता. त्यांचे मूळ गांव कोदळ, तालुका पाटण, जिल्हा सातारा आणि शिक्षण मेकॅनिकल इंजिनीअरींग डिप्लोमा व बी.ए. (राजकारण शास्त्र व इतिहास) असे झाले आहे.
