सिंधु स्वयंपूर्णा प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद..

कुडाळ : तालुक्यातील नेरूर येथील वसुंधरा विज्ञान केंद्र येथे सिंधु स्वयंपूर्णा प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २२ व २३ मार्च २०२५ रोजी करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
गेल्या दोन वर्षापासून वसुंधरामध्ये सिंधु स्वयंपुर्णा या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिला व महिला बचत गट यांनी तयार केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थ या प्रदर्शनामध्ये स्टॉल्समधून मांडण्यात येतात. या प्रदर्शनाचे उद्घाटन नेरूर समृद्धी प्रतिष्ठानच्या डॉ. नंदिनी देशमुख यांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला पाणी घालून आणि सिंधू स्वयंपूर्णा फलकाचे अनावरण करून करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यवाह- विश्वस्त सतीश नाईक, सिंधुदुर्ग बँक महिला विकास सहाय्यक श्रीम. नमिता खेडेकर, वनस्पती अभ्यासक श्री. रामचंद्र शृंगारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ, मसाले, लोणची, सरबते, ज्वेलरी, बांबू उत्पादने, गृहउपयोगी, शोभिवंत आणि नियमित वापरावयाच्या वस्तू विविध वीस स्टॉल्समधून मांडण्यात आले होते. सर्व सहभागीनी आपापल्या उत्पादनाची वैशिष्ट्यासहीत माहिती सर्वांना या कार्यक्रमामधून दिली. या प्रदर्शनाला ग्रामस्थ, महिला आणि समाजाच्या सर्व थरांमधून चांगला प्रतिसाद मिळाला.

You cannot copy content of this page