सावंतवाडीत तिघे पोलिसांच्या ताब्यात…
⚡सावंतवाडी ता.२३-: व्हिडिओ गेमच्या नावाखाली लोकांकडून पैसे स्वीकारत जुगार चालवल्याप्रकरणी शहरात असलेल्या विराज व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई करण्यात आली.या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई काल सायंकाळी सहा वाजता करण्यात आली. मात्र रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
दर्शन सिताराम वाडकर (वय २७, रा. समाज मंदिर, सावंतवाडी), रॉजर जॉन डीसोझा (वय २५ रा. जिमखाना, सावंतवाडी) आणि सुभाष श्रीधर भोसले (वय ६८, रा. कणकवली) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीसांच्या पथकाकडून करण्यात आली. याप्रकरणी प्रसाद कदम यांनी सावंतवाडी पोलिसांना तक्रार दिली आहे. यात व्हिडिओ गेम खेळण्याच्या आठ मशीन जप्त करण्यात आल्या असून तिघांवर जुगार अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडी पालिकेच्या इंदिरा गांधी कॉम्प्रेस मधील गाळा नं. ३२ मध्ये व्हिडिओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगार खेळला जात असल्याची माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काल सायंकाळी उशिरा छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. त्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत शहरात खळबळ उडाली आहे.
