बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचा आदर्शवत उपक्रम..

कोरोना काळात आरोग्य विभागाच्या मदतीसाठी धाव

सिंधुदुर्ग – दि. 24 – सद्याच्या कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. आरोग्य यंत्रणेमध्ये अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर येत असलेला ताण विचारात घेऊन कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने मदतीचा हात पुढे केले आहे. या शिक्षण संस्थेचे कुडाळ येथे नर्सिंगचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या 10 विद्यार्थीनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोविड वॉर्डमध्ये सेवा बजावणार आहेत. त्यामध्ये 4 थ्या वर्षाच्या बी.एसस्सी नर्सिंग, तिसऱ्या वर्षाच्या जीएनएम आणि दुसऱ्या वर्षाच्या एएनएम विद्यार्थीनींचा समावेश आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष उमेश गोळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विणा जोशी, उप प्राचार्य कल्पना भंडारी, मानसशास्त्र अभ्यासक पियुषी तेंडोलकर, वैशाली ओटवणेकर यांचे सहकार्य लाभले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनीही संस्थेच्या कामाचे कौतुक करत त्यांना लगेच प्रतिसाद देऊन विद्यार्थींनींना सामान्य रुग्णालयामध्ये सेवा देण्यासाठी मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्थांनीही अशा प्रकारे कोरोना काळात पुढाकार घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. सद्याचा कोरोनाचा काळ हा कठीण काळ आहे. समाजाला लागणारी मदत प्रत्येकजण आपापल्या परीने करतच आहे. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा हा उपक्रम नक्कीच सर्वांसाठी एक आदर्श आहे.

You cannot copy content of this page