⚡बांदा ता.१९-: येथील दिव्य ज्योती इंग्लिश मिडीयम प्रशालेत खास पालकांसाठी ‘फनफिस्ट २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी विविध मैदानी तसेच सांघिक क्रीडा प्रकारात सहभागी होत ‘बचपन आफ्टर पचपन’ अनुभवले. यामुळे पालकांना पुन्हा लहानपण अनुभवायची संधी मिळाली.
प्रशालेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्या एकत्रित कार्याचा समन्वय, विचारांची देवाणघेवाण खूप महत्वाची असते. प्रशालेच्या सर्वांगीण यशात शिक्षक, विद्यार्थी यांसोबतच पालकांची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते. म्हणूनच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी एकत्र यावे, एकमेकांच्या नवनवीन कल्पना, विचार समजून त्यांचे योग्य पद्धतीने उपयोजन व्हावे तसेच पालकांनी एक दिवस आपल्या पाल्यासाठी देऊन आपल्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा या दुहेरी हेतूने 'फनफिस्ट २०२५' चे खास आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. खास पालकांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच बलून रेस, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, रस्सीखेच, टाईल्स गेम्स, कप अँड बलून गेम, अशा अनेक गमतीशीर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व खेळात पालकांनी उस्फुर्त सहभाग दर्शवत आपले बालपण अनुभवले. मुलांनीही या गमतीशीर कार्यक्रमाचा आनंद लुटला. विजेत्या पालकांना प्रशस्तीपत्रक व पदक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी प्रशालेत मिसळ पाव, भजी, सरबत, जूस सेंटर, कलिंगड, विविध गेम्स चे स्टॉल लावले होते. या स्टॉलना पालकांकडून भरपूर पसंती मिळाली. कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेल्या सेल्फी पॉईंटने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. रोजच्या व्यस्त, धकाधकीच्या जीवनात एक दिवस स्वतःच्या पाल्यासाठी आणि स्वतःसाठी देत पालकांसाठी फनफिस्ट चा आनंदादायी अनुभव अविस्मरणीय ठरला. प्रशाळेने आगळावेगळा उपक्रम राबवून पालक व शाळा यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला.
फोटो:-
बांदा दिव्य ज्योती प्रशालेत फनफिस्ट कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालक व मान्यवर.
