अन्यथा आंदोलन: रवी जाधव यांचा इशारा..
⚡सावंतवाडी ता.१६ अक्षय धुरी-: सावंतवाडी- आंबोली महामार्गावरील लाखे वस्तीसमोरील हाय टेन्शन लाईटचा पोल खालून पूर्णपणे गंजला असून, तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहने, प्रवासी आणि शाळकरी मुले ये-जा करतात. तसेच, पोलच्या आजूबाजूला मोठी वस्ती असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने गंजलेला हाय टेन्शन पोल बदलावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक बांधिलकीचे सदस्य रवी जाधव यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ग्रामस्थांनी वारंवार महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत तक्रारी दिल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी, नागरिकांमध्ये संताप असून, पोल तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे. गावातील प्रमुख मंडळी आणि सामाजिक संघटनांनीही प्रशासनाला लवकरात लवकर हा धोकादायक पोल बदलण्याची विनंती केली आहे. तरी देखील हा पूल बदलण्यात आला नाही त्यामुळे ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर उपाययोजना केली नाही आणि अपघात घडला, तर त्यास संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील. जर त्वरित उपाययोजना करण्यात आली नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
