चिमणी पाखरं’ चा नृत्य सन्मान सोहळा उत्सहात संपन्न…

लावणी किंग आशिष पाटील यांची विशेष उपस्थिती:निलेश जोशी जीवन गौरव पुरस्काराने तर मृणाल सावंत विशेष पुरस्काराने सन्मानित..

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सर्वात मोठा अवॉर्ड शो अर्थात चिमणी पाखरं डान्स अकॅडेमी प्रस्तुत नृत्य सन्मान सोहळा शनिवारी सायंकाळी उशिरा कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये उत्साहात संपन्न झाला. लावणी किंग नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांची उपस्थिती हे या सोहळ्याचे खास वैशिट्य होते. रंगकर्मी आणि पत्रकार निलेश उर्फ बंड्या जोशी यांना यंदाचा जीवन गौरव तर कथक नृत्यांगना मृणाल सावंत हिला विशेष कर्तृव पुरस्कार देऊन आशिष पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर आशिष पाटील यांच्या सुंदरी या कार्यक्रमात निवड झालेल्या दीक्षा नाईक हिचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील ८० कलाकारांचा सन्मान करण्यात आला. नृत्य सन्मान पुरस्काराचे हे यंदाचे दुसरे पर्व आहे.
कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या चिमणी पाखरं डान्स अकॅडेमी आयोजित नृत्य सन्मान सोहळ्याचा शुभारंभ नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांच्या हस्ते गणेश पूजन, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते नटराज पूजन आणि जितेंद्र सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाला. यावेळी व्यासपीठावर लावणीकिंग आशिष पाटील, नागराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, उदघाटक जितेंद्र सावंत, नगरसेविका नयना मांजरेकर, सौ. रुपाली शिरसाट, सागर माळकर, एकनाथ माळकर, एकनाथ पिंगुळकर, नागेश नाईक, संजना परब, सौ. बिर्जे, किरण कुडाळकर, सतीश पावसकर, चिमणी पाखरंचे सल्लागार सुनील भोगटे, अध्यक्ष रवी कुडाळकर, नृत्यांगना दीक्षा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या वतीने दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार रंगकर्मी, पत्रकार निलेश उर्फ बंड्या जोशी यांना आशिष पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, नटराज मूर्ती आणि रोख रुपये पाच हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा विशेष कर्तृत्व पुरस्कार कथ्थक नृत्यांगना मृणाल अजय सावंत हिला आशिष पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी निलेश जोशी आणि मृणाल सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना चिमणी पाखरं संस्थेचे आभार मानून संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनतर विविध क्षेत्रातील जिल्ह्यातील सुमारे ८० कलाकरांना मान्यवरांच्या हस्ते नृत्य सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील आणि सुंदरी कार्यक्रम फेम नृत्यांगना दीक्षा नाईक हीचा चिमणी पाखरं संस्थेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. आशिष पाटील यांच्या कार्याची ओळख करून देणारी चित्रफीत देखील दाखवण्यात आली. दीक्षा नाईक आणि आशिष पाटील यांनी सुंदरी गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या कलाकारांनी वेगवेगळी नृत्य सादर केली.
आपले मनोगत व्यक्त करताना आशिष पाटील यांनी चिमणी पाखरंच्या उपक्रमाचे कौतुक केले. कलाकाराने नेहमी शिकत राहिले पाहिजे. शिकणे थांबविले कि माणसाची प्रगती थांबते. मी कोणी मोठा कलाकार नाही, मी अजूनही शिकतोय. प्रत्येक कलाकाराला रंगमंच मिळणे खूप महत्वाचे असते. म्हणून चिमणी पाखरंच्या आयोजकांचे कौतुक करावेसे वाटते. त्यांनी कलाकारांना असा रंगमंच उपलब्ध करून दिला. पालकांनी मुलांच्या पाठीशी नेहमी उभे राहावे. त्यांची कला जोपासावी असे आवाहन आशिष पाटील यांनी यावेळी केले. दीक्षा नाईकचे कौतुक करून त्यांनी तिच्या निवडीची प्रक्रिया सांगितली. तिचे भविष्य उज्ज्वल असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
यावेळी नागेश नाईक, प्राजक्ता बांदेकर, सुनील भोगटे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुनील भोगटे आणि उपस्थितांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कदम आणि रवी कुडाळकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक, नृत्य कलाकार, कोरिओग्राफर, पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page