ॲड. निलांगी रांगणेकर- सावंत:एसआरएम कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा..
कुडाळ : आर्थिकदृष्ट्या स्त्री सक्षम झाली म्हणजे ती सक्षम झाली असे नाही जोपर्यंत ती मानसिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत अन्य सर्व केवळ बाह्य आणि तात्पुरते उपचार आहेत. शिवाय स्त्रीकडे पाहण्याची तिची स्वतःची आणि समाजाची ही दृष्टी बदलण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक वेळी अत्याचार ग्रस्त स्त्रीलाच दोष दिला जातो किंवा तिच्याविषयी वाईट बोलले जाते हे बदलणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध वकील ॲड निलांगी रांगणेकर- सावंत यांनी केले. संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या या नात्याने त्या बोलत होत्या.
संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि कुडाळ तालुका विधि सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, नीलांगी रांगणेकर सावंत , ॲड. रूपाली कदम, मानसोपचार तज्ञ डॉ. रूपाली पाटील आणि डॉ. शरयू असोलकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला “मुझे क्या बेचेगा रुपैया” हे गाणे मानसी भागवत या विद्यार्थिनीने सादर केले. रानभाज्या प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. डॉ. रूपाली पाटील यांनी स्त्रियांच्या मानसिक आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ॲड रूपाली कदम यांनी महिला विषयक कायद्यांचे विवेचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरुन बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी समाजातील स्त्रियांच्या दुय्यम स्थानाविषयी दिसणाऱ्या उदाहरणांचे उल्लेख करून आता स्त्रियांनी याविषयी आवाज उठवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन करताना पुष्यमित्र उपाध्याय यांच्या “सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद न आयेंगे “ या सुप्रसिद्ध कवितेचे प्रभावी वाचन केले. प्रसार माध्यमातील जाहिरातीमधून स्त्री विषयक दृष्टिकोन काही अपवाद वगळता अतिशय पारंपरिक आणि आणि त्यांचे दुय्यम स्थान अधोरेखित करणारा असतो याविषयी त्यांनी उदाहरणांसहित विवेचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. शरयू आसोलकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता मांजरेकरने केले तर आभार वासुदेव सावंत याने मानले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. उमेश कामत यांचे तसेच तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे श्री. आरेकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
