काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ १५ मार्चला सिंधुदुर्गात…

पदाधीकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार:प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील पत्रकार परिषद..

कुडाळ : काँग्रेसचे नूतन प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे येत्या १५ मार्च रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत आणि त्याची सुरुवात ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून करतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष .ऍड. गणेश पाटील यांनी दिली. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
येथील एमआयडीसी रेस्टहाऊस वर ऍड. गणेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ऍड. गणेश पाटील यांच्यासह प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, टिळक भावनेचे अधीक्षक नामदेव चव्हाण, प्रदेश सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख उपस्थित होते. ऍड. गणेश पाटील म्हणाले, ज्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेस अडचणीत आहे अशा जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्ष मजबुतीसाठी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करावी या उद्धेशाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. या बाबतचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आणि काँग्रेसचे पदाधिकारी जाहीर करतील. प्रामुख्याने कार्यकर्त्यांशी चर्चा हाच दौऱ्याचा मुख्य हेतू असून त्यांनतर ते १६ मार्च रोजी रत्नागिरी दौरयावर जातील असे ऍड. पाटील यांनी सांगितले.
ऍड. पाटील पुढे म्हणाले, मागे काय झाले याबाबाबत मी काही बोलणार नाही, पण या पुढच्या काळामध्ये फरक दिसेल. कुडाळच्या माजी नगराध्यक्ष आफरीन करोल आणि अक्षता खटावकर या अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्या. त्याबद्दल बोलताना ऍड. पाटील म्हणाले, काही पक्षांतरे हि वैयक्तिक कारणांमुळे किंवा अडचणींमुळे होऊ शकतात. त्याशिवाय राज्यामध्ये हल्ली काहीसे दडपशाहीचे वातावरण आहे आणि काही वेळा स्वार्थ असतो. या कारणांमुळे त्या गेल्या असतील पण गेले ते गेले, त्या बाबतीत काय बोलायचे, असे ऍड. पाटील म्हणाले.

पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांचे ‘ते’ वक्तव्य निषेधार्ह

विरोधी ग्राम पंचायतींना निधी देणार नाही हे पालकमंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याचे ऍड. गणेश पाटील यांनी म्हटले आहे. मंत्री पदावर काम करताना शपथ घ्यावी लागते. त्यामुळे काम करताना पक्षाची झूल बाजूला ठेवून जनतेचे काम करावे अशी त्यांच्या कडून अपेक्षा असते. सरकारने जनतेसाठी काम करणे अपेक्षित आहे. पण पालकमंत्री म्हणून नितेश राणे तसे वागत नसतील तर ते निश्चितच निषेधार्ह आणि चुकीचे असल्याचे ऍड. पाटील यांनी सांगितले.

   काँग्रेसचे जुने नेते समीर वंजारे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटविण्यात आले होते. त्याबाबत बोलताना ऍड. पाटील म्हणाले, नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सूत्रे हाती घेण्यापूर्वीची ती घटना आहे. त्या नियुक्तीला गेल्यावेळच्या प्रांताध्यक्षानी स्थगिती दिली आहे. त्या वादामध्ये जाण्यापेक्षा येथे येण्यापूर्वी मी श्री. वंजारी यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न केला. १५ मार्चच्या कार्यक्रमात श्री. वंजारे आमच्या सोबत दिसतील असे ऍड. पाटील यांनी सांगितले. 
उबाठा गटातून सुद्धा अनेक नेते भाजप शिवसेनेत जात आहेत त्याबाबत बोलताना, तो त्या पक्षाचा प्रश्न असल्याचे ऍड. पाटील यांनी सांगितले. पक्ष म्हटल्यानंतर राजी-नाराजी सगळीकडे असते. अगदी घरात सुद्धा असते. पण काँग्रेसमध्ये त्या प्रमाणात नाराजी नाहीये. जर असलीच तर ती आम्ही सांभाळून घेतो. त्यामुळे आमच्या पक्षातून आऊटगोईंग राहणार नाही असे ऍड. गणेश पाटील शेवटी म्हणाले. 
 यावेळी प्रकाश जैतापकर, ऍड. दिलीप नार्वेकर, विलास गावडे, व्ही. के. सावंत, विजय प्रभू, प्रवीण वरुणकर, अरविंद मोंडकर, जेम्स फर्नांडिस, महेंद्र मांजरेकर, महेंद्र सांगेलकर, अभय शिरसाट, किरण टेंबुलकर, रवींद्र म्हापसेकर, श्रीकृष्ण तळवडेकर, सुरज घाडी, अनिकेत दहिबावकर, विधाता सावंत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
You cannot copy content of this page