मालवण बंदर जेटी रस्त्याच्या चुकीच्या कामाबाबत नागरिकांचा बंदर विभागावर संताप…

अन्यथा आम्ही जेसीबी फिरवून रस्ता मोकळा करू ; सुदेश आचरेकर, सतीश आचरेकर यांचा इशारा..

⚡मालवण ता.१०-:
मालवण बंदर जेटी येथील रस्ता दोन्ही बाजूने खणल्यामुळे या मार्गावरुन अग्निशमन बंब काल रविवारी रात्री मेढा येथे नौकेला आग लागलेल्या ठिकाणी पोहोचू शकला नाही. बंब उपलब्ध न झाल्याने ही आग आटोक्यात आली नाही, तसेच लागलेली आग बाजूच्या वस्ती परिसरात पसरली असती तर जीवितहानी झाली असती. बंब घटनास्थळी न पोहचण्यास बंदर जेटी रस्त्याचे चुकीच्या पद्धतीने सुरु असलेले काम जबाबदार असून हे काम नित्कृष्ट दर्जाचेही आहे, असा आरोप मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, युवा कार्यकर्ते सतीश आचरेकर यांनी बंदर विभागावर करत बंदर जेटी रस्त्याच्या एका बाजूचे काम ४८ तासात पूर्ण न केल्यास या सुरु असलेल्या कामावर आम्ही जेसीबी फिरवून रस्ता वाहतुकीस मोकळा करू, असा संतप्त इशारा बंदर अधिकाऱ्यांना दिला.

काल रविवारी रात्री मालवण मेढा समुद्र किनारी नौकेला आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी किनाऱ्यावर जाण्यासाठी मार्ग असलेल्या बंदर जेटी रस्त्यावर दोन्ही बाजूनी काम सुरु असल्याने अग्नीशमन बंब जळीत नौकेच्या ठिकाणी पोहचू शकला नाही. याबाबत काल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त झाल्यावर आज माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व युवा कार्यकर्ते सतीश आचरेकर, मच्छिमार सोसायटीचे विकी चोपडेकर यांच्यासह नागरिकांनी मालवण बंदर विभाग कार्यालयावर धडक देत बंदर निरीक्षकरजनीकांत पाटील यांना जाब विचारला. तसेच बंदर जेटी रस्त्याची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून हे काम चुकीच्या पद्धतीने व नित्कृष्ट दर्जाने सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी रोहन आचरेकर, आनंद आचरेकर, एजाज मुल्ला, मॉन्टी तारी, आपा मोरजकर, यशवंत मेथर, चंदू सरकारे, विनायक मोरजकर, बाबा मुकादम, संतोष पराडकर, अनिकेत जोशी, प्रथमेश पेडणेकर, हेमंत रामाडे, राजू आढाव, समद मुकादम आदी व इतर उपस्थित होते.

मेढा व राजकोट किनारी परिसरात जर कोणतीच दुर्घटना घडली तर बंदर जेटी रस्ता खोदल्यामुळे त्याठिकाणी अग्नीशमन बंब पोहोचू शकत नाही. कोणाला वैद्यकीय उपचारासाठी नेण्यासाठी याठिकाणी रुग्णवाहिकाही पोहोचू शकत नाही. या कामाच्या ठेकेदाराने रस्त्याची एक बाजू पहिल्यांदा खोदून त्याठिकाणचा रस्ता बनविला जाईल व नंतर दुसऱ्या बाजूने रस्ता खोदून तो बनविणार आहोत असे स्थानिकांना सांगून देखील ठेकेदाराने दोन्ही बाजूने रस्ता खोदल्यामुळे पर्यटक तसेच स्थानिकांना याचा फटका बसत आहे, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे असे यावेळी सुदेश आचरेकर व सतीश आचरेकर यांनी सांगितले. यावेळी सुदेश आचरेकर व सतीश आचरेकर यांनी ठेकेदाराला फोनद्वारे संपर्क साधत जाब विचारला.

तसेच बंदर जेटी रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने व नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप सुदेश आचरेकर यांनी केला. गटार बांधण्यापूर्वीच रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे, इस्टीमेटप्रमाणे काम चालू आहे की नाही पाहण्यासाठी आम्हाला या कामाचे इस्टीमेट दाखवावे, असे यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले. तसेच पंधरा दिवस हा रस्ता बंद आहे, कामात दिरंगाई होत आहे आज देखील काम बंद आहे, यामुळे रस्ता अजून महिनाभर असाच रखडून राहणार आहे. मालवण शहरात येणाऱ्या पर्यटकांना याचा त्रास होत आहे. बंदर जेटी पर्यंत पोहोचता येत नसल्याने पर्यटक आपला मोर्चा दुसरीकडे वळवत आहेत, असे सतीश आचरेकर म्हणाले. रस्ता खोदल्यापासून गेले काही दिवस धंदा होऊ शकला नाही, त्यामुळे जेटी पारिसरातील स्थानिक छोट्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. येत्या ४८ तासात या रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण करून एका बाजूने रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा आम्ही जेसीबी फिरवून आमच्या पद्धतीने रस्ता मोकळा करू, असा इशारा सुदेश आचरेकर, सतीश आचरेकर व उपस्थित नागरिकांनी दिला.

यावेळी बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी रस्त्यावरील वीज पोल वीज कंपनीने दिलेल्या मुदतीत न हटविल्याने कामाला थोडा विलंब झाला आहे. मात्र याबाबत तोडगा काढून रस्त्याचे काम लवकरात लवकर काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page