महिलांना कमी लेखू नका, त्यांना सन्मानाने वागवा…

सौ. स्वप्नाली कवटकर:श्री शिवाजी वाचन मंदिरात महिला दिन साजरा..

⚡मालवण ता.१०-:
हातात बांगड्या भरलेली, डोळ्यात अश्रू असलेली महिला वेळप्रसंगी दुर्गेचे रूप घेऊ शकते. त्यामुळे महिलांना कधी कमी लेखू नका, महिलांना सन्मानाने वागवा, असे प्रतिपादन शिक्षिका सौ. स्वप्नाली कवटकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरात महिला दिन साजरा करण्यात आला. शिक्षिका सौ. स्वप्नाली कवटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी साक्षी सावंत, अस्मि आठलेकर, श्रध्दा‌ राठोड, संस्कृती बांदकर, निहार कोचरेकर, वेदांत बांदेकर, दाक्षायिणी जुवाटकर, हेमा परुळेकर यांनी महिला दिनानिमित्त आपल्या मनातील विचार व्यक्त करत महिलांविषयक काव्य सादर केले.

यावेळी संस्थेच्या कार्यवाह सौ. वैदेही जुवाटकर यांनी समाजात आज घडत असलेल्या वास्तव प्रसंगाची जणीव करून देत आपल्या मुलींना वेळप्रसंगी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे, असे सांगितले. सौ. संस्कृती बांदकर यांनी उपस्थित मुले व स्त्रियांना कोडी विचारून स्पर्धा घेतली तसेच संगीत खुर्ची खेळण्यात आली. स्पर्धेतील विजेते कु.अस्मि आठलेकर व अजंली पांजरी यांना पुस्तक भेट देऊन कौतुक केले. यावेळी संस्थेचे बाल वाचक, पालक, सदस्य सौ. अक्षता बांदेकर, ग्रंथपाल सौ. मानसी दुधवडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page