⚡मालवण ता.०५-:
वडाचापाट येथील शांतादुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामस्थांच्या मदतीने मसदे येथे वनराई बंधारा बांधल्याने या भागातील बागायतींना त्याचा मोठया प्रमाणावर फायदा होणार आहे
मसदे येथील सामाजिक कार्यकर्ते अजित भास्कर प्रभू यांनी वनराई बंधारा बांधण्यासाठी शांतादुर्गा हायस्कुलचे सहकार्य मागितले असता प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी त्यासाठी होकार दिल्यावर शांतादुर्गा हायस्कूलच्या २८ विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत श्रमदानातून आणि ग्रामस्थांच्या मदतीने मसदे येथे वनराई बंधारा बांधला.
यावेळी मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी बंधारा बांधण्याचे फायदे सांगितले. तसेच बंधारा बांधल्यामुळे जवळपास एक एकर क्षेत्र पाण्याखाली येणार असल्याने गावातील सर्व लोकांना याचा फायदा होणार आहे. या बंधाऱ्यामुळे नाचणी, कुळीथ, भुईमूग यासारखी बागायती शेती तसेच माडांच्या झाडांसारख्या फळझाडांना पाणी उपलब्ध होणार आहे, उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा उपलब्ध होत नाही तो चारा या पाण्याद्वारे घेतला जाईल, असे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले.
वनराई बांधल्यामुळे ताराचंद आत्माराम पालव, अनिल प्रभू, यतीन मेस्त्री व कीर्तीराज कदम यांनी सर्वांचे आभार मानले. अनिल प्रभू यांचे वनराई बंधाऱ्यासाठी विशेष योगदान लाभले. हा बंधारा बांधण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल, शिक्षिका प्रतिभा केळुसकर, लिपिक महेश गावडे व हर्षदा पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले.
