गरिबाला एक न्याय तर धडग्यांना दुसरा न्याय खपवून घेणार नाही:एमआयडीसी अधिकारी श्री. रेवंडकर यांना घेराव घालत मनसेचा इशारा..
कुडाळ : मुंबई गोवा हायवे ते गवळदेव मार्गे एमआयडीसी रस्ता काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम करताना गरिबाला एक न्याय आणि धनदांडग्यांना दुसरा न्याय हे खपवून घेणार नाही. रस्ता कामात आडव्या येत असलेल्या त्या हॉटेलची भिंत पाडण्यात प्रशासनाला अडचण का येते आहे, असा सवाल करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज एमआयडीसीचे उप अभियंता श्री. रेवंडकर याना घेराव घातला. हा अन्याय खपवून घेतला जाणारा नाही, वेळ आलीच तर काम बंद पाडू असा इशारा मनसेने दिला आहे.
मुंबई गोवा हायवे ते गवळदेव मार्गे एमआयडीसी रस्ता काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहे. सदर काम सुरू करण्यापूर्वी या रस्त्यावर बरेच ठिकाणी काही प्रमाणात स्थानिक पथविक्रेते यांचे स्टॉल होते. ते हटवण्यात आले. तसेच काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे होती. तीही सुजाण नागरिक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने आणि काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेवुन हटविण्यात आली. रस्त्याचे काम सुरू झाले. असे असताना सदर रस्त्यावर असलेल्या तीव्र उतार व वळणाच्या ठिकाणी शासकीय जमिनीत अतिक्रमण करुन बांधकाम केलेली, हाॅटेलची सुरक्षा भिंत (कंपाऊंड वाॅल) हटविताना, प्रशासनाच्या नाकी नऊ नेमके का येत आहेत.याचा जाब आज मनसे ने MIDC ला विचारला.जर अनधिकृत शासनाच्या जमिनीत असलेली, धनदांडग्या मालकाची भिंत पाडण्यास अभय देत असाल तर पुढील काम करायला विरोध करुन काम सुरू ठेऊ देणार नाही प्रसंगी सुरू असलेले काम बंद पाडू असा इशारा मनसे कडुन देण्यात आला.
पैसेवाल्या व्यवसाईकाच्या दबावा मुळे सदर अनधिकृत सुरक्षा भिंत (कंपाऊंड वाॅल) काढली जात नाही आहे. सबंधीत मालकाने आपली जमीन शासकीय मोजून घेतली, हद्द निश्चित केली. तरी देखील हद्दी बाहेरची शासनाची जमिन आपली आहे. अस सांगुन अनधिकृत भिंत काढण्यास विरोध दर्शवत असल्याचे समजले. या बाबत एमआयडीसी कडुन शासकीय मोजणी करुन भिंत काढणार असे आश्वासन रेवणकर यांनी दिले.
ज्या वेळेस मोजणी होणार त्याच वेळेस हद्द निश्चित करुन भिंत पाडावी. व रस्ता वळण काढुन सरळ करावा. भविष्यात अपघात टाळता येतील अशी मागणी करण्यात आली. अन्यथा जन आंदोलन उभे करु. असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला. यावेळेस जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपतालुकाध्य गजानन राऊळ, जगन्नाथ गावडे, यतीन माजगावकर उपस्थित होते.
