यंदाचा आरती प्रभू पुरस्कार नाटककार प्रशांत दळवी यांना जाहीर…

बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या वतीने दिला जातो पुरस्कार:पत्रकार परिषदेत केदार सामंत यांनी दिली माहिती.

⚡कुडाळ ता.२७-: कुडाळ मधील बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आरती प्रभू पुरस्कार यावर्षी मुंबई येथील प्रसिध्द नाटककार प्रशांत दळवी यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा चिं.त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांच्या जन्मदिनी शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वा. एकनाथ ठाकूर सभागृह, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री.दळवी यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहीती बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत श्री.सामंत बोलत होते. यावेळी बाबा वर्दम थिएटर्सचे संस्थापक चंदू शिरसाट, आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष अनंत वैद्य, डाॅ.संजीव आकेरकर, विवेक देसाई, प्रा. आवटी आदी उपस्थित होते.
श्री.सामंत म्हणाले, कै. चिं.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु हे कुडाळचे सुपुत्र. त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभेबद्दल कुडाळच्या साहित्य, नाट्य व शैक्षणिक क्षेत्रात वावरणाऱ्या सर्वांना अतिशय आदर आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात याकरीता त्यांच्या नावाने कवी, कवयित्री आणि नाटककार यांना आरती प्रभु पुरस्कार दिला जातो. बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा आरती प्रभू पुरस्कार सन २०१३ पासून कविता आणि नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कवी किंवा नाटककारास दरवर्षी दिला जातो. रोख २१ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र व शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सन २०१३ सालचा पहिला पुरस्कार गोवा येथील प्रसिध्द कवी व नाटककार विष्णु सूर्या वाघ, सन २०१४ सालचा पुरस्कार पुणे येथील प्रसिध्द नाटककार सतीश आळेकर तर सन २०१५ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द नाटककार शफाअत खान, सन २०१६ सालचा पुरस्कार नागपूर येथील प्रसिध्द नाटककार महेश एलकुंचवार, सन २०१७ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द नाटककार श्रीम. सई परांजपे, सन २०२८ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द कवी महेश केळूसकर, सन २०१९ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द कवी किशोर कदम उर्फ सौमित्र, सन २०२१ सालचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द नाटककार प्रेमानंद गज्वी, सन २०२२ सालचा पुरस्कार प्रसिध्द कवी गुरु ठाकूर, सन २०२३ सालचा पुरस्कार पुणे येथील प्रसिध्द कवयित्री श्रीम. अरुणा ढेरे, सन २०२४ सालचा पुरस्कार पुणे येथील प्रसिध्द नाटककार चं. प्र. देशपांडे यांना प्रदान करण्यात आला आहे.
या वर्षीचा पुरस्कार मुंबई येथील सुप्रसिध्द नाटककार प्रशांत दळवी यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते, सुप्रसिध्द दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, बाबा वर्दम थिएटर्सचे संस्थापक चंदू शिरसाट, कमशिप्र मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत व बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर लगेचच नाटककार श्री.दळवी, ज्येष्ठ कवयित्री नीरजा व दिग्दर्शक श्री.कुलकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. रंगकर्मी डॉ. जी. एस. कुलकर्णी हे मुलाखत घेणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी केले आहे.

‘द कॉन्शन्स’ नाटकाचा ‘दयासागर छात्रालय’ मदतीसाठी सावंतवाडीत प्रयोग

 बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ ही संस्था गेली ५३ वर्ष महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रस्थानी आहे. या संस्थेने द काॅन्शन्स या नाटकाची निर्मिती केली आहे. आतापर्यंत कुडाळ, मुंबई, पुणे आदी ठिकाणी ५ प्रयोग झाले असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.  मुंबईच्या प्रयोगाला अजित भुरे, शफाअत खान, ओंकार राऊत, संजीव कुलकर्णी असे अनेक मान्यवर प्रयोगाला उपस्थित होते. त्यांनी नाटकाचे कौतुक करून महाराष्ट्रभर या नाटकांचे प्रयोग झाले पाहिजेत असे सांगितले. दरम्यान येत्या १२ मार्च रोजी बॅ.नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे या नाटकाचा प्रयोग होणार आहे. यावेळी जमणारा निधी निराधारांसाठी कार्य करीत असलेल्या दयासागर छात्रालय रोणापाल या संस्थेला दिला जाणार आहे. १३ एप्रिल रोजी बेळगाव व त्यानंतर कणकवली, कोल्हापूर व अन्य भागात नाटकाचे प्रयोग होणार असून, यशस्वी वाटचाल चालू असल्याचे यावेळी केदार सामंत यांनी सांगितले.
You cannot copy content of this page