कणकवली : शनिवार, दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडलेल्या कणकवली तालुक्यातील एम. व्ही. डी. कला अकादमी, ओसरगांव आयोजित कोकणभूमी साहित्य कला संमेलन २०२५ मधील बाल दशावतार स्पर्धेमध्ये कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली मधील मुलींनी सादर केलेल्या ‘महिषासूर मर्दिनी’ या दशावतार नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला असून ते स्पर्धेतील फिरत्या चषकाचे पहिले मानकरी ठरले आहेत. जेष्ठ कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या संमेलनाला प्रमुख अतिथी लेखिका डॉ. शकुंतला भरणे यांबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक- सौरभअग्रवाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी -घनश्याम आढाव, जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी -कविता शिंपी तसेच सुरज बांदेकर, कवी किशोर कदम आणि कॅप्टन विलास सावंत इ. मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण मयूर गवळी व रेडकर यांनी केले. कोकणच्या मातीतील पारंपारिक दशावतारी नाट्यकलेचा वारसा जोपसण्याच्या उद्देशाने कळसुली हायस्कूलच्या इयत्ता आठवी व इयत्ता नववीतील मुलींनी दशावतार नाटक सादर केले व आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकातील प्रमुख महिषासुराची भूमिका मेघा दळवी हिने उत्तमरित्या साकारत सारा रंगमंच दणानून सोडला तर वेदिका मेस्त्री हिने नारदाच्या भूमिकेतून सुमधुर गायनाने साऱ्यांना मंत्रमुग्ध केले. या नाटकाचे दिग्दर्शन सी.जी. चव्हाण, सी.सी. चव्हाण आणि अमर पवार यांनी केले. या बहारदार सादरीकरणासाठी सर्वांनीच या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी सर्व विद्यार्थ्यांना खास भेटून त्यांच्या कलेचे कौतुक केले. सदर नाटकाच्या यशस्वीतेसाठी सर्वच पालकांचे चांगले सहकार्य लाभले. यामध्ये प्रशांत दळवी यांनी मोलाची भूमिका बजावली. सदर विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे, तसेच संस्था पदाधिकारी पुरुषोत्तम दळवी (अध्यक्ष- कळसुली शिक्षण संघ मुंबई ), सूर्यकांत राजाराम दळवी (कार्याध्यक्ष), विजय सावंत (सरचिटणीस), प्रकाश दळवी (सल्लागार) तसेच स्कूल कमिटी चेअरमन के. आर. दळवी, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि इतर सदस्य, पालक, ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतरवृंद आजी-माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
कळसुली हायस्कूलचा बाल दशावतार नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक…
