राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेसाठी मालवणच्या सिंधुदुर्ग कॉलेज ची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिची निवड…

⚡मालवण ता.१४-:
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसी विभागाअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेली तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थीनी एनसीसी अंडर ऑफिसर हर्षदा दीपक पवार हिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आज पर्यंतच्या इतिहासात एनसीसी विभागातून राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेली हर्षदा पवार ही पहिली खेळाडू ठरली आहे.

हर्षदा पवार ही आर्मीकडून नेमबाजी स्पर्धे मध्ये सहभागी झालेली आहे. 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग एनसीसी विभागाकडून ती सध्या खेळत आहे. आतापर्यंत तिने दहा दिवसाचे ११ कॅम्प केलेले आहेत. त्याचबरोबर एक महिन्याचे दोन कॅम्प केलेले आहेत. त्या प्रत्येक कॅम्पमध्ये ती विजयी झाली असून ९ फेब्रुवारीपासून ९ मार्चपर्यंत दिल्ली या ठिकाणी होत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेत आर्मी एनसीसी कडून तिची निवड झालेली आहे. आतापर्यंत तिने कोल्हापूर, पुणे, मुंबई ,तामिळनाडू ,केरळ,आणि भोपाळ अशा अनेक ठिकाणी आणि राज्यातून विविध फायरिंग कॅम्पमध्ये विजयी होऊन पुढील फेरीसाठी तिची निवड होत गेलेली आहे. भारतामध्ये एनसीसी अंतर्गत असणारे विद्यार्थ्यांची संख्या १५ लाखापेक्षा अधिक असून एवढ्या विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड होणे ही महाराष्ट्रासाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी , मालवण तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. कुमारी हर्षदा हीचे मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण झाले असून २०१९ मध्ये सर्वप्रथम कुमारी हर्षदा हिने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील एअर रायफलिंग शुटींग स्पर्धेसाठी निवड झाली होती

आता मालवण कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या हर्षदा हिला गेली दोन वर्षे आर्मी ऑफिसर कर्नल दीपक दयाल तसेच सुभेदार मेजर दिनेश गेडाम, ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, एनसीसी असोसिएट ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांचे मार्गदर्शन लाभत आहे हर्षदा हिच्या या यशाबद्दल आणि सिंधुदुर्ग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सीडीसी अध्यक्ष समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुशे, शालेय समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण यांच्यासह संस्था पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कडेट्स यांनी अभिनंदन केले आहे. तसेच मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनीही अभिनंदन केले.

You cannot copy content of this page