Headlines

कुडाळ मध्ये १६ रोजी गिरणी कामगार व वारसदार मेळावा…

⚡कुडाळ ता.१२-: सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाच्यावतीने कुडाळ येथे गिरणी कामगार, वारसदार व ईपीएस ९५ पेन्शन धारकांचा मेळावा रविवार,  १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संघटक शांताराम परब यांनी केले आहे.
सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने गिरणी कामगार त्यांचे वारसदार व त्याचप्रमाणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएस ९५ निवृत्ती वेतन धारकांचा संयुक्त मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा रविवार,  सकाळी १०.०० वाजता बॅरिस्टर नाथ पै  वि‌द्यालय, कुडाळ (कॉलेज नाही), कुडाळेश्वर मंदीर शेजारी  येथे होईल. या मेळाव्यात महाराष्ट्र सरकारने १५ मार्च, २०२४ रोजी शासन निर्णय जारी करून गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांचा मुंबईत घरे देऊन पुनर्वसन करण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला आहे व त्याऐवजी एमएमआरडीएच्या क्षेत्रात घरे देण्यासंबंधी धोरण जाहीर केले आहे. या धोरणाप्रमाणे मुंबई पासून सुमारे १०० किलोमीटर लांब असलेल्या ठाणे जिल्हयातील शेलु तसेच वांगणी येथे पडीक जमिनीवर गिरणी कामगारांची घरे देण्यासंबंधी विकासकांची नेमणूक केलेली आहे व ती घरे घेण्या सबंधी गिरणी कामगार वारसदारांना सांगण्यात येत आहेत. ही एक प्रकारे गिरणी कामगार वारसदारांची फसवणूक आहे. सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने सातत्याने गिरणी कामगार व वारसदारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत याबाबत आंदोलने केली जात आहेत. आजही मुंबईच्या एनटीसी गिरण्यांच्या जमिनी उपलब्ध आहेत, इतरही जमिनी आहेत, त्या बिल्डरांना नफा कमविण्याकरीता ‌द्यायच्या व गिरणी कामगार व वारसदारांना ग्रामीण भागात पडीक जमिनीवर घरे द्यायची, तीसु‌द्धा भरमसाठ किंमतीत द्यायची, या धोरणाच्या विरोधात राज्याच्या विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुंबईत मोठे तीव्र आंदोलन करण्याबाबतची रूपरेषा या मेळाव्यात जाहीर करण्यात येणार आहे. याबरोबरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मधील निवृत्ती धारकांची (ईपीएस ९५ पेन्शनर्स) फसवणूक केंद्र सरकारकडून केली जात आहे, त्याबाबतही माहिती दिली जाणार असून पुढील लढ्‌याची दिशाही जाहीर करण्यात येणार आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता सर्व श्रमिक संघटनेचे नेते कॉमेड विजय कुलकर्णी, कॉमेड बी. के. आंब्रे, कॉमेड संतोष मोरे उपस्थित राहणार आहेत. पुण्याहून प्रमुख वक्ते  अनंत मालप येणार आहेत. ते मार्गदर्शन करणार आहेत
तरी या मेळाव्याला गिरणी कामगार व वारसदार तसेच ईपीएस 95 पेन्शन धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संघटक शांताराम परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page