पूर्णिमा गावडे-मोरजकर यांना नेरूरकर स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर…!

⚡बांदा ता.१०-: येथील नट वाचनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार यावर्षी युवा मालवणी साहित्यिका सौ. पूर्णिमा प्रकाश गावडे-मोरजकर यांना जाहीर करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारी रोजी नेरुरकर जयंतीचे औचित्य साधून वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
शुक्रवार दिनांक १४ रोजी संध्याकाळी ४ वाजता वाचनालयात नेरुरकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. कै. नेरुरकर यांनी बांदा शहरात साहित्य लिहिले आहे. त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या हा प्रसिद्ध आहेत. त्यांनी बांदा गावाला ‘पिंपळगाव’ ही उपमा दिली होती. त्यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी एका नवोदित साहित्यिकाला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
पूर्णिमा गावडे मोरजकर हा मालवणी साहित्यिका असून त्यांचे ‘गजाल गाथण’ हा मालवणी कथासंग्रह हा नुकताच प्रकाशित झाला आहे. त्या स्तंभलेखिका असून समाज माध्यमावर त्यांचे अनेक मालवणी ब्लॉग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तरी या कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमी व सरांच्या विद्यार्थी वर्गाने आणि मित्रपरिवाराने उपस्थित राहावे असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page