सावंतवाडी । प्रतिनिधी : कोलगाव येथील एका युवकाचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना काल रात्री ११ च्या सुमारास घडली आहे. रामचंद्र रविंद्र तथा मयुर चौगुले (२५, रा. कोलगाव नाईकबाग ) असे त्या युवकाचे नाव असून, छातीत दुखत असल्याने गोळ्या आणण्यासाठी तो मेडिकलमध्ये गेले असता तिथेच तो खाली कोसळला व अत्यवस्थ झाला होता. यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला येथील कुटीर रूग्णालयात दाखल केले. परंतु तत्पूर्वीच त्याचे दुर्दैवी निधन झाले होते. मृत मयूरच्या पश्चात वडिल व आई असा परिवार आहे. दरम्यान, मयूर याच्या काही दिवसांपासून छातीत दुखत होते. परंतु, किरकोळ दुखणे असल्याचे वाटल्याने तो खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. सावंतवाडी गवळी तिठा येथे त्याची छोटीसी व्यवसायाची टपरी होती. काल सायंकाळीही नेहमीप्रमाणे त्याच्या छातीत दुखत असल्याने काढा करून त्याने पिला होता. मात्र, तरीही त्याला त्रास जाणवू लागल्याने अखेर शहरातील एका मेडिकल स्टोअर मध्ये रात्री ११ च्या सुमारास तो गोळ्या घेण्यासाठी गेला. तेथेच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तो खाली कोसळला. याबाबतची माहिती मिळताच त्याच्या मित्रांनी त्याला त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दोन वर्षांपूर्वी त्याच्या लहान भावाचा अलिबाग येथे बुडून दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा पहाडच कोसळला असून कोलगाव गावावरही शोककळा पसरली आहे. त्याच्या या आकस्मिक निधनाची सावंतवाडी पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मेडिकल मध्ये गेलेल्या युवकाचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन
