पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी..
⚡देवगड ता.०३-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विध्यार्थी क्रीडापटूंना क्रीडा विश्वात उत्तम संधी मिळावी तसेच त्यांना करियर संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी स्थापन व्हावी अशी पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आज जिल्हा नियोजन बैठकी दरम्यान निवेदन देत मागणी केली आहे.दरम्यान राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झालेबद्दल तसेच जिल्ह्याच्या पालक मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .
जिल्ह्यात उत्तम खेळाडू निर्माण होऊन त्यांना राज्य राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी चांगले प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे .खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे त्याचा लाभ मिळावा देशाला सर्वोत्तम खेळाडू मिळावे अश्या अनेक कारणांसाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन होणे आवश्यक असल्याचे मत या वेळी जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थ्यांसंबंधी ऑनलाईन माहिती भरण्यासाठी ब्रॉडबँड सेवा तसेच कॉम्प्युटर प्रिंटर किमान केंद्र शाळांना मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे.
संघटनेने या पूर्वीच एका निवेदनाद्वारे मुलींना एक रुपया मिळणारा उपस्थिती भत्ता किमान दहा रुपये मिळावा या साठी मागणी केली होती, त्याला यश येत उपस्थिती भत्ता पाच रुपये दिल्यास किती तरतूद करावी लागेल या बाबत शासनाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून माहिती मागविण्यात येत असल्याने समाधान व्यक्त केले आहे.या मागणीचा पाठ पुरावा सुरू असल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिल्याचेही संघटनेने सांगितले आहे.
त्याचबरोबर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षण विभाग ,योजना शाखा व सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांची एकत्रित बैठक पालकमंत्री या नात्याने आपल्या अध्यक्षतेखाली आयोजित करावी अशी विनंती सुद्धा या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.अशी माहिती महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन जाधव जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर यांनी दिली. यावेळी देवगड तालुका अध्यक्ष आनंद जाधव हेही उपस्थित होते.
