सदस्य नोंदणी अभियानात सिंधुदुर्ग अव्वल राहणार…

भाजपचे जिल्हा संयोजक रणजित देसाई:सध्या राज्यात सहाव्या क्रमांकावर..

ओरोस ता २८
महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीचे सदस्यता अभियान १ जानेवारी पासून सुरू झाले असून या अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा २७ जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर आहे. या अभियानाची मुदत संपेपर्यंत जिल्हा पहिल्या दोन जिल्ह्यात राहणार आहे, अशी माहिती अभियानाचे जिल्हा संयोजक रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य संध्या तेरसे, कुडाळ महिला अध्यक्ष सुप्रिया वालावलकर, कार्यालय महामंत्री समर्थ राणे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना देसाई यांनी, जिल्ह्यात ९२१ बूथ आहेत. प्रत्येक बुथवर २०० सभासद करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एक लाख ८४ हजार एवढे उद्दिष्ट जिल्ह्याला आहे. त्यातील दीड लाख उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ७० ते ७५ टक्के काम झाले आहे, असे सांगितले.
प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खा नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान जिल्ह्यात जोमात सुरू आहे. जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठी मेहनत यासाठी घेतली आहे. तसेच अभियानाचे सह संयोजक महेश सारंग, मनीष दळवी, श्वेता कोरगावकर, संदीप साटम, संदीप मेस्त्री यांनीही चांगले काम केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख ३० हजार ऑनलाईन सभासद नोंदणी झाली आहे. २० हजार एवढी ऑफलाईन नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे २०० बूथ कार्यक्षेत्रात नेटवर्क नसल्याने यात अडसर येत आहे. परंतु अभियान संपेपर्यंत आम्हाला देण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या पुढे जावून सभासद नोंदणी जिल्ह्यात होवून आपला जिल्हा राज्यात पहिल्या दोन जिल्ह्यात राहील, असा विश्वास यावेळी श्री देसाई यांनी व्यक्त केला.

चौकट
राज्यात पक्षीय पातळीवर ७८ जिल्हे निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये शहरे आणि ग्रामीण भाग वेगवेगळे करण्यात आले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग पूर्ण जिल्हा एकच जिल्हा म्हणून यामध्ये समाविष्ट आहे. सभासद नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात सहावा राहिला आहे. कोकणात प्रथम आहे. राज्यात पुढे असलेल्या जिल्ह्यांत धुळे, उल्हासनगर, मिरा भाईंदर, अकोला, जळगाव या पाच शहरांचा समावेश आहे. त्यांना केवळ ६० हजारांचे उद्दिष्ट होते. परंतु आम्हाला एक लाख ८४ हजाराचे उद्दिष्ट आहे. त्यात आम्ही पुढे आहोत. आमच्यातील काही सभासदांना व्यक्तिगत रेफरल कोर्डवर सभासद नोंदणी करण्यास देण्यात आली होती. त्यात महेश सारंग यांनी एक हजार सभासद केले आहेत. २५ ते ३० सभासदांनी ५०० च्या वर सभासद केले आहेत. तर बहुसंख्य सभासदांनी २५० पेक्षा जास्त सभासद केले आहेत. तसेच सावंतवाडी आणि कणकवली मतदार संघात ५० हजार पेक्षा जास्त सभासद झाले असून कुडाळ मतदार संघात ३० हजार सभासद झाले आहेत, असे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page