ट्रक चालक – मालक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यलयासमोर उपोषण:शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली भेट..
सिंधुदुर्ग : साटेली तर्फ सातार्डा येथील पंचक्रोशीतील मायनिंग प्रकल्पांवर स्थानिक ट्रक व्यवसायिकांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी ट्रक चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यलयासमोर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले. यादरम्यान उपोषणकर्त्यांनी तेथे सुरू असलेल्या मायनिंग व बेजबाबदारपणे वाहतूक कशी केली जाते याचा पाढाच वाचला. परंतु या सगळ्यात येथील स्थानिक ट्रक चालक – मालकांवर उपासमारीची वेळ उद्भवू नये म्हणून ट्रक चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याशी देखील चर्चा केली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांचे बोल काही वेगळेच असल्याचे श्री. पारकर यांच्या लक्षात आले. दरम्यान यावेळी संदेश पारकर यांनी पुन्हा एकदा उपोषणकर्त्या ट्रक चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी ट्रक चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साटेली मायनिंग प्रकल्प सुरु झालेले आहेत. मात्र सदर मायनिंग प्रकल्पामध्ये आम्हा स्थानिकांची वाहने लावण्याऐवजी मायनिंगधारकांनी परराज्यातील वाहनांना उत्खननासाठी काम देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आमची वाहने कामाअभावी बंद पडलेली असून आमच्याच गावात प्रकल्प सुरु असूनही त्याचा आम्हाला काहीही उपयोग नाही. जर या मायनिंग कंपनीला स्थानिकांना रोजगार देता येत नसेल, मुलभुत गरजा पुरवता येत नसतील तर या कंपनीचा गावाला उपयोग काय ? आज ही मायनिंग कंपनी अशा प्रकारे गावातील खनिज स्त्रोत केवळ स्वतःच्या फायद्यासाठी नेत असतील आणि त्यामुळे गावाचा काहीच विकास होणार नसेल, स्थानिकांना रोजगार मिळणार नसेल, गावात फक्त प्रदुषणच होणार असेल तर याचा प्रशासनाने विचार करावा, अन्यथा लवकरच पुढील भूमिका जाहीर करू असा थेट इशाराच दिला आहे.
दरम्यान यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी यासाठी आपल्याला एकत्र येऊन ट्रक चालविण्यासाठी असलेले नियम, अटी यांचा सखोल अभ्यास करून भूमिका ठरवावी लागेल. “जिंकू किंवा मरु’ असा विश्वास देत आपण आरटीओच्या अधिकाऱ्यांची देखील भेट घेऊन यावर चर्चा करून पुढील मार्ग स्वीकारू मात्र या जिल्ह्यात बिड जिल्ह्याप्रमाणे काहीतरी घडवण्याचा असलेल्या डाव उधळून लावू असे सांगितले. तसेच सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने लढले पाहिजे त्यामुळे संघटना बळकट होते. परंतु आपण संबंधितांशी बोलून लोकशाही मार्गाने मार्ग काढता येतो का पाहतो. लढायचं झालं तरी चालेल मागे हटायचं नाही, असा विश्वास जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी ट्रक चालक मालक संघटनेच्या उपोषणकर्त्या पदाधिकऱ्यांना दिले.
