कर्मचारी पदोन्नतीसाठी छेडणार आंदोलन;कमलताई परुळेकर यांचा इशारा
सिंधुदुर्गनगरी ता २० सार्वजनिक बांधकाम विभागातील गट ड संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना गट क मध्ये पदोन्नती देण्यात यावी. ही प्रक्रिया ३० एप्रिल पर्यंत पूर्ण न झाल्यास १ मे या कामगार दिनी सर्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी कार्यालयासमोर कामगारांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा कोकण सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कामगार संघाचे अध्यक्ष कमलताई परुळेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. कोकण सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कामगार संघ अध्यक्ष कमलताई परुळेकर यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागातील गट ड संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना गट क मध्ये पदोन्नती देण्याची प्रक्रिया ६ जून २०१७ पासून सुरू झाली असून अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग ची एकत्रित यादी तयार होऊन तब्बल सव्वा वर्ष उलटले तरीही अद्याप पदोन्नती दिलेली नाही. कोल्हापूर, धुळे ,सातारा, सोलापूर, नाशिक या विभागातून पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होऊन मैल मजूर गट-क वर्गात रुजू झाले. मात्र रत्नागिरी मंडलमध्ये हि प्रक्रिया राजकीय दबावाने रखडवली जात आहे .ही दुर्दैवी गोष्ट आहे .पदोन्नती पात्र उमेदवारांच्या अस्मितेची शासनाकडून कुचेष्टा होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तरी रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळातील पदोन्नती पात्र कर्मचाऱ्यांना गट क मध्ये ३० एप्रिल पर्यंत नेमणूक पत्र देऊन पदोन्नती द्यावी. कोणत्याही कारणास्तव ही प्रक्रिया पुढे ढकलण्यास येऊ नये. ही प्रक्रिया ३० एप्रिल पर्यंत पूर्ण न झाल्यास १ मे या कामगार दिनानंतर संबंधित कामगारांना घेऊन आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी आपणावर राहील .असा इशारा कमलताई परुळेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी मंडळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सध्या कार्यरत असलेले संवर्ग ड मधील अनेक कर्मचारी हे आमच्या युनियनचे सभासद आहेत. व सामान्य प्रशासन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०१९ च्या निर्णयानुसार ते पदोन्नतीसाठी पात्र आहेत. तरी १८ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील किती पदे रिक्त आहेत, ३१ मार्च २०२१ अखेर पदोन्न तीस पात्र किती उमेदवार आहेत? त्यापैकी किती उमेदवार पदोन्नतीने क संवर्गात जाण्यास आपणाकडून प्रस्तावित केले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना नेमणूक पत्रे कधी मिळणार आहेत या बाबत माहिती मिळावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
