पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे:गावागावात असे कोणी जादूटोणा करताना आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिस निरीक्षक यांचे निदर्शनास आणावी..
⚡मालवण ता.०९-: मानवी जीवनातील काही समस्या या आपल्या आकलनापलिकडच्या असतात. त्या समस्यांच्या निराकरणासाठी आपण जादूटोणा करणारे भोंदू बाबांकडे श्रद्धेने जातो. अशावेळी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या मध्ये चिकित्सेची जी रेषा असते ती रेषा स्वतःमधील वैज्ञानिक दृष्टीकोनातून तपासल्यास आपली फसवणूक होणार नाही. यासाठी जादूटोणा विरोधी कायदा मनापासून समजून घ्यावा, असे आवाहन मालवणचे पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी केले.
जादूटोणा विरोधी कायदा प्रसार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती – PIMC आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पोलिस ठाणे मालवण यांच्या पुढाकाराने मालवण तालुक्यातील सर्व पोलिस पाटील यांच्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची कार्यशाळा मालवण पोलिस ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर, मारुती सोनवडेकर, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष भिकाजी परब, उपाध्यक्षा समिक्षा सुकाळी, सचिव मधुकर परब, खजिनदार दशरथ गोवेकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी उपस्थितांना जादूटोणा विरोधी कायदा हा देव,धर्मा विरुद्ध नाही, मात्र देव धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या भोंदू लोकांसाठी हा कायदा करण्यात आला असल्याचे समजावून दिले. हा कायदा फक्त नरबळी, इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणा या पाच शब्दांपासून बनला असून एकूण बारा अनुसूची या कायद्यात समाविष्ट असून या पलिकडच्या कृतींना कायदा लागू नसल्याचे चौकेकर यांनी सांगितले. तसेच गावागावात असे कोणी जादूटोणा करताना आढळल्यास त्याची माहिती तात्काळ दक्षता अधिकारी तथा पोलिस निरीक्षक यांचे निदर्शनास आणावी असे आवाहन विजय चौकेकर यांनी केले .
यावेळी उपस्थित पोलिस पाटील यांनी मार्गदर्शनातून कायदा समजावून घेतला. सर्व पोलिस पाटील यांना जादूटोणा विरोधी कायद्याची पत्रके वाटण्यात आली. तसेच विविध प्रात्यक्षिकेही करून घेण्यात आली.
