वैभव नाईक:विमान उड्डाणे रामभरोसे
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर येत्या पंधरा दिवसात मुंबई उड्डाण सुरू झाले नाही तर या विमानतळाला कुलूप लावू असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून पाच वर्षांपूर्वी चिपी विमानतळ सुरू झाले. सुरुवातीच्या काळात मुंबई आणि त्यानंतर बेंगलोर, पुणे, हैदराबाद या मार्गावर चिपी येथून विमानसेवा सुरू झाली होती. पण दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथील विमान सेवा बंद झाली. आता केवळ एक विमान इथून ये जा करत आहे. येथील विमानसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे हे विमानतळ बंद करण्याचा घाट शासनाकडून घातला जात आहे का अशी शंका येते.
मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल असे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांनी सांगितले होते, पण ही सेवा अजूनही सुरू झालेली नाही. आता हे विमानतळ बंद होण्याच्या स्थितीत आहे दोन दिवसातून एक विमान येथे उतरते आणि उड्डाण करते. भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी हे विमानतळ सुरू होणार असे वारंवार सांगितले आहे. पण या विमानतळावरून सेवा सुरू झालेली नाही. येत्या पंधरा दिवसात जर मुंबई ची विमानसेवा सुरू झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या विमानतळाला कुलूप लावण्यात येईल, असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. महाराष्ट्रात कुठेही न झालेला विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम आम्हाला करायला भाग पाडू नका असेही माजी आमदार वैभव नाईक यांनी शेवटी सांगितले.
